
गोंधळाची मालिका सुरुच
पुणे, ता. १ : प्रभागरचना तयार करण्यापासून सुरू असलेल्या गोंधळाची मालिका प्रारूप प्रभागरचना जाहीर करतानादेखील कायम राहिली आहे. महापालिका प्रशासनाने आज (ता. १) दुपारी बाराच्या सुमारास प्रारूपरचनेचे नकाशे महापालिकेत आणि क्षेत्रीय कार्यालयांमध्ये लावले. पण त्यासोबत प्रभागांची सीमा निश्चित करणारी अधिसूचना जाहीरच केली नाही. ‘‘थोड्या वेळात जाहीर होईल,’’ असेच उत्तर प्रशासनाकडून सायंकाळपर्यंत मिळत असल्याने प्रभागरचना समजून घेताना कार्यकर्ते, इच्छुक उमेदवारांची चांगलीच दमछाक झाली.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी तीन सदस्यांचा प्रभाग असल्याने ही प्रभागरचना कशी असणार? कोणचा प्रभाग राहणार? कोणता नव्याने तयार होणार? याची उत्सुकता मतदारांसह इच्छुक उमेदवार, विद्यमान नगरसेवकांनादेखील होती. महापालिकेच्या प्रभागरचनेत मोठ्या प्रामाणात राजकीय हस्तक्षेप झाल्याने ती वादात सापडली. तसेच बाणेर-बालेवाडीचा प्रभाग क्रमांक १३ हा दोन सदस्यांचा असणार असे सांगितले जात होते. तो त्याच पद्धतीने झाल्याने प्रभागरचना फुटली असल्याचेही स्पष्ट झाले. तसेच प्रारूप प्रभागरचना जाहीर होण्याच्या एक दिवस आधीच प्रभागांची नावे जाहीर झाल्याने गोंधळात भर पडली. अशास्थितीत जाहीर होणाऱ्या प्रारूप आराखड्याकडे लक्ष होते.
महापालिका प्रशासनाने दुपारी १२च्या सुमारास प्रभागरचनेचे नकाशे महापालिकेत लावले. त्यापूर्वी अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन आढावा घेतला. महापालिकेत संपूर्ण शहराच्या प्रभागरचनेचा एक आणि प्रत्येक प्रभागाचा एक असे नकाशे लावण्यात आले. अनेकांनी सकाळी ११ पासून महापालिकेच्या संकेतस्थळावर अपडेट घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यावर माहिती व नकाशे टाकण्यात आलेले नव्हते. त्यामुळे इच्छुक व कार्यकर्त्यांनी क्षेत्रीय कार्यालय व महापालिका भवनात येऊन माहिती घेतली. दुपारी २ नंतर ५८ प्रभागांचे नकाशे पालिकेच्या संकेतस्थळावर देण्यात आले.
नकाशे पाहिल्यानंतर प्रभागाचा आकार मोठा आहे की लहान आहे हे लक्षात येत असले, तरी प्रभाग कोणत्या भागातून तोडला आहे, कोणती सोसायटी, वस्ती जोडली आहे हे कळत नव्हते. त्यामुळे प्रत्येकजण स्वतःच्या क्षमतेनुसार प्रभागरचना समजावून घेत होता. दरम्यान, सायंकाळी सहानंतर अधिसूचना महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर झाली.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..