अफू की ढेंगळा कांदा पोलिसांचा झाला वांदा!

अफू की ढेंगळा कांदा
पोलिसांचा झाला वांदा!

‘‘आरं इकडं शेतात कशाला आलायसा? घरी तुम्हाला तांदूळ आणि ज्वारी वाढली नसती का? वर दहा-वीस रुपये पण दिलं असतं. बरं आता इकडं आलाच आहेस तर ‘लग्नाला चला तुम्ही लग्नाला... ‘हे भारुड म्हणून दाखवा,’’ रामरावांनी खाकी ड्रेस घातलेल्या दोघांना म्हटलं.
‘‘ए आम्हाला काय बहुरुपी समजतोस काय? आम्ही खरोखरीचे पोलिस आहेत. हे आमचं आयकार्ड.’’ पोलिसांचे बोलणे ऐकून रामराव वरमले. ‘‘आमच्याकडं पोलिसांची कपडे घालून लई जण येत्यात. पाच-दहा रुपये दिले की एकदम खुश होतात म्हणून मला वाटलं तुम्ही त्यातलंच आहेत. एकडाव माफी असू द्या.’’ रामरावने गयावया करत म्हटले. त्यावर पोलिसांची नजर शेतात काहीतरी शोधू लागली.
‘‘साहेब, काय चुकलं का? गरीबाची कशी काय आठवण काढली.’’ रामरावने विचारले.
‘‘तुम्ही अफूची शेती करताय, असा संशय आम्हाला आहे. त्यामुळे आम्ही तपासणी करायला आलोय.’’ एका पोलिसाने म्हटले. ‘‘साहेब, हजार -पाचशे हवं असेल तर तसं सांगा पण गरीब शेतकऱ्याची बदनामी करू नका. कोरोनामुळं सगळ्यांचीच गणितं चुकल्यात, त्याला तुम्ही तरी कसं अपवाद असाल? पैसे नसतील तर आम्ही धान्य देऊ. आम्ही शेतकरी शेतात आलेल्या कोणालाच रिकाम्या हातानं परत पाठवत नसतो, एवढं लक्षात ठेवा. आम्ही कधीच अफूसारखं वंगाळ काम करीत नाही.’’ रामरावांनी पोलिसांना सुनावलं.
‘‘तुमची जीभ फारच चुरुचुरू बोलायला लागली. आम्हाला खात्री असल्याशिवाय आम्ही छापा टाकत नसतो. मी तुमच्या शेतात कोठेही जाऊ शकतो, कोठेही तपासणी करू शकतो. तुम्ही मला अडवू शकत नाही. हे माझे आयकार्ड बघा.’’ असे म्हणून पोलिसाने रामरावच्या डोळ्यासमोर आयकार्ड नाचवले. त्यानंतर पोलिस उसाच्या शेतात शिरले. बराचवेळ त्यांनी तपासणी केली व हातात काहीतरी घेऊन आले.
‘‘उसात अफूची शेती करताय आणि वर आम्हालाच शहाणपणा शिकवताय काय?’’ एका पोलिसाने म्हटले. त्यावर रामराव म्हणाले, ‘‘साहेब, ते अफूचं पीक नाही. ढेंगळा कांदा आहे.’’ असं म्हणून रामरावांनी बियाणांचा कांदा व अफूतील फरक सांगितला. त्यानंतर पुन्हा पोलिस शेताच्या दुसऱ्या टोकाकडं जाऊ लागले. त्यांना मध्येच थांबवत रामराव म्हणाले, ‘‘साहेब, प्लीज तिकडं जाऊ नका.’’ त्यावर साहेब उखडले. ‘‘तू कोण सांगणार मला तिकडं जाऊ नको म्हणून. मी कोठेही जाईल. कोठेही तपासणी करील. तेवढे अधिकार मला आहेत. हे बघ माझे आयकार्ड.’’ असे म्हणून साहेबांनी पुन्हा रामरावच्या डोळ्यासमोर ते नाचवले. ‘‘पण...साहेब...माझं ऐका...’’ रामरावांनी विनंती केली. त्यावर साहेब पुन्हा चिडले. ‘‘मला अडवण्याची कोणाची हिंमत नाही. मला खूप पॉवर आहेत. माझं हे आयकार्ड बघा.’’ असे म्हणून ते दोघेही दुसऱ्या टोकाकडे जाऊ लागले. दहा मिनिटांतच दोघांच्याही किंकाळ्या ऐकू आल्या. पोलिस पुढे व त्यांच्यामागे दोन शिकारी कुत्रे लागले होते.
‘‘वाऽऽचऽवा, वाऽऽचऽऽवाऽऽ’’ असे साहेब जोरात ओरडत पळत होते. त्यावर रामराव जोरात म्हणाले, ‘‘साहेब कुत्र्यांना आयकार्ड दाखवा ना.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com