अन्यथा, आठवडाभरानंतर कडक निर्बंध

अन्यथा, आठवडाभरानंतर कडक निर्बंध

पुणे, ता. १५ : "पुणे शहर व जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असली तरी चिंता करण्याची गरज नाही. रुग्ण गंभीर होण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण खूप कमी आहे. परंतु संसर्ग वेगाने वाढत आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधासाठीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. पुणेकर नियम पाळत नसल्यानेच शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नियम पाळा, अन्यथा आठवडाभरानंतर कोरोनाचे निर्बंध आणखी कडक केले जातील,'''' असा गंभीर इशारा पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

पालकमंत्री पवार यांनी शनिवारी (ता. १५) पुणे जिल्ह्यातील कोरोना संसर्ग आणि त्याच्या प्रतिबंधासाठी करावयाच्या संभाव्य उपाययोजनांचा आढावा घेतला. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी इशारा दिला आहे.
राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधासाठी जाहीर केलेल्याच नियमावलीची सध्या पुणे शहर व जिल्ह्यात अंमलबजावणी केली जात आहे. आणखी आठवडाभर सरकारचीच नियमावली लागू राहील. तुर्तास त्यात कोणताही बदल नाही. परंतु रुग्णवाढीचा वेग कायम राहिल्यास, पुढील आठवड्यात आयोजित केल्या जाणाऱ्या कोरोना आढावा बैठकीत कठोर निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


कोणत्याही परिस्थितीत शहर व जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करा. कोरोना लसीकरण वाढवा, शाळा-शाळांमध्ये १५ ते १७ या वयोगटातील विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण करा, पुरेसा औषधसाठा, आवश्यक त्या सोयींनी युक्त रुग्णवाहिका, ऑक्सिजनयुक्त खाटांची उपलब्धता करून आरोग्य व्यवस्था सक्षम होण्याच्या दृष्टीने उपाययोजना गतीने करा.
अजित पवार, उपमुख्यमंत्री


पवारांच्या पुणेकरांकडून अपेक्षा काय?
* नागरिकांनी गर्दीत जाणे टाळावे
* गरज असेल तरच घराबाहेर पडावे
* प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळावी
* सामाजिक अंतराचे पालन करावे
* मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करावा
* रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळावे
* लक्षणे दिसताच, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

कोरोना प्रतिबंधासाठीच्या उपाययोजना
* गरज पडल्यास जम्बो कोविड हॉस्पिटल सुरू करणार
* पिंपरी चिंचवडमधील जम्बो हॉस्पिटल पुन्हा सुरू करणार
* सार्वजनिक, राजकीय, खासगी कार्यक्रमांवर बंदी .
* मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींना ५०० रुपयांचा दंड
* सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना एक हजार रुपयांचा दंड
* राहिलेल्या व्यक्तींचे कोरोना लसीकरण करणार
* विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी शाळांमध्ये लसीकरणाची सोय

35964

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com