अमर मोहितेच्या आत्महत्येनंतर एमपीएससी विद्यार्थ्यांचा संताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमर मोहितेच्या आत्महत्येनंतर
एमपीएससी विद्यार्थ्यांचा संताप
अमर मोहितेच्या आत्महत्येनंतर एमपीएससी विद्यार्थ्यांचा संताप

अमर मोहितेच्या आत्महत्येनंतर एमपीएससी विद्यार्थ्यांचा संताप

sakal_logo
By

पुणे, ता. १५ ः ‘‘मराठा आरक्षण रद्द झाल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवाराला आत्महत्या करावी लागली. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच त्याला जीव गमवावा लागला,’’ असा आरोप करून स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी सरकार विरोधात संताप केला.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेतील पोलिस उपनिरीक्षक पदासाठी मुख्य परीक्षेत अमर मोहिते हा विद्यार्थी पात्र ठरला होता. मात्र, मराठा आरक्षण रद्द झाल्याने एमपीएससीने संयुक्त पूर्व परीक्षा २०१९ या परीक्षेचा सुधारित निकाल जाहीर केला आहे. त्यात एका गुणामुळे अमरला परीक्षा प्रक्रियेतून बाहेर पडावे लागले. सध्या या पदासाठी मैदानी चाचणी आणि मुलाखती सुरू आहेत. त्यामुळे त्याला नैराश्य आले होते. तसे तो मित्रांकडे बोलूनही दाखवत होता. शनिवारी मात्र थेट टोकाचे पाऊल उचलत त्याने आत्महत्या केली, असे त्याच्या जवळच्या मित्रांनी सांगितले.
एमपीएससीच्या परीक्षा पास होण्याचा प्रवास साधा नसतो. अचानक तुमची ज्या प्रवर्गातून, ज्या आरक्षणातून निवड झाली आहे, ते आरक्षण आता रद्द झाले आहे. लागलेला निकाल रद्द होणार आहे. पुन्हा नव्याने निकाल जाहीर होणार आहे. निकालाची निवड यादी पाहिले असता आपले नाव त्यातून गायब झालेले असते. काय मनःस्थिती होत असेल, किती विचारांचे वादळ मनात सुरू होत असेल ? हे काय झाले, आता काय करायचे, हे सर्व विचार अमर मोहितेच्या मनात आले नसतील का ? परीक्षेत अपयश येणं ही वेगळी गोष्ट आहे. परंतु, निवड झाल्यानंतर तुमचं नाव निवड यादीतून वगळले जाणे हे कसे पचवायचे? याचे उत्तर सरकार देणार आहे काय? असे प्रश्न राजकुमार देशमुख या विद्यार्थ्याने सरकारला विचारले आहेत.

‘‘आज तीन ते चार हजार विद्यार्थी नैराश्यात आहेत. संयुक्त पूर्व परीक्षा गट ब २०२० या परीक्षेतबरोबर प्रश्न रद्द केले. काहीही चूक नसताना अनेक विद्यार्थी परीक्षा प्रक्रियेतून बाहेर पडले आहेत. यामुळे विद्यार्थी नैराश्यात आहेत. अमरने उचलेले पाऊल टोकाचे असून काही झाले, तरी विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पावले उचलू नये.’’
- सूरज पवार, विद्यार्थी.

‘‘अमरने आत्महत्या केली, ही दुर्दैवी व वेदनादायी घटना आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न शासनाने लवकर सोडवावा. असे किती बळी घेणार आहात? आता सरकारने याची गार्भीयांनी दखल घ्यावी.’’
- कुलदीप आंबेकर, अध्यक्ष, स्टुडंट हेल्पिंग हँड.

सरकारकडून या आहेत विद्यार्थ्यांच्या अपेक्षा
- परीक्षा ठरलेल्या वेळेतच घ्या.
- एमपीएससीची सदस्य संख्या पूर्ण क्षमेतेने भरा.
- मराठा आरक्षणाचा एकदाचा काय तो प्रश्न निकाली काढा.
- नोकर भरती बाबत गंभीर होत पावले उचला, अन्यथा राजीनामे देऊन घरी बसा.
- विद्यार्थ्यांना दिलेले शब्द किमान एकदा तरी पूर्ण करा.
- एमपीएससीने काही नवीन प्रयोग राबविण्यापेक्षा कार्यक्षमतेत सुधारणा करावी.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top