उद्योग-व्यवसायाची भरभराट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्योग-व्यवसायाची भरभराट
उद्योग-व्यवसायाची भरभराट

उद्योग-व्यवसायाची भरभराट

sakal_logo
By

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी ः महाराष्ट्र हे सृजनशिल लोकांचे राज्य आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत प्रगत आहे. जगातील विकसीत देशांमध्येही महाराष्ट्राचा नावलौकीक आहे. समाजातील अनेकविध घटकांना सहजतेने सामावून घेणारे हे सर्वसमावेशक असे राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा केलेला राज्य कारभार हा माझ्यासमोर आदर्श होता. त्याच दृष्टीने राज्यकारभार करायचा प्रयत्न केला.
मध्यंतरीच्या काळात संयुक्त महाराष्ट्र वगळता काँग्रेसेतर शिवसेना-भाजप युतीची सत्ता राज्यात प्रथम आली. त्यात माझ्याकडे चार वर्षे मुख्यमंत्री पदाचा कारभार होता. शिक्षण, उद्योग क्षेत्रात राज्याची प्रगती अतुलनीय आहे. महाराष्ट्र सुरक्षित आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र खूप पुढे आहे. राज्याचे स्वरूप सर्वसमावेश आहे. मी रायगडसारख्या ग्रामीण भागातून येऊन मुंबईमध्ये उभा राहिलो. राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. ही संधी मला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिली. चार वर्षे मुख्यमंत्री म्हणून काम करताना मी शिवाजी महाराजांची नीती अवलंबून समाजातील सर्व स्तरातील नागरिकांचा विकास करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. त्यामुळे माझ्या काळात राज्यातील उद्योग-व्यवसायाची भरभराट झाली.

राज्याच्या विकासासाठी वेळ द्या
माजी मुख्यमंत्री नारायण राणे : राज्याला देशात अव्वल करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचा हा गौरव समारंभ आहे. मुख्यमंत्री पदावरून राज्याचा कारभार नेमका कसा करायचा, याची दिशा यशवंतराव चव्हाण यांनी दाखविली. त्यामुळे महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात देशात आघाडीवर आहे. सर्व जाती धर्मातील उद्योजकांनी हे राज्य मोठे केले. मुंबई, पुणे, नागपूर येथे उद्योग बहरले. राज्याच्या जडणघडणीत या सर्वांचे योगदान आहे. देशाच्या तिजोरीत ३४ टक्के हिस्सा महाराष्ट्राचा आहे.
शिक्षण, वैद्यकीय सेवा, उद्योग यात महाराष्ट्र पुढे आहे. उद्योजकांच्या वाढीसाठी वीज, रस्ते, कायदा सुव्यवस्था अशा पायाभूत सुविधा आवश्यक असतात. महाराष्ट्रात उद्योग आहेत; पण उद्योगात महाराष्ट्र कुठे आहे?
राज्यातील १३ कोटी जनतेला राज्य सुरक्षित असेल पाहिजे. सुक्ष्म, लघु आणि मध्यम खात्याचा मंत्री आहे, राज्यातील मुख्यमंत्री, उद्योग मंत्र्यांना पत्र पाठविले, मला जागा पाहिजे, पण वेळ दिली नाही. अनुभवी माणसाने कोणी चुकत असेल तर कान पकडले पाहिजे. कोणत्या पक्षाचा नेता आहे हे पाहू नका. २००-२५० कोटी रुपयांचे उद्योग आहेत. तुम्ही फक्त जमीन द्या, बाकी सगळे आम्ही बघू. तुम्ही उद्योजकांनी केवळ आवाज द्या, आम्ही मदत करू. राजकारण बाजूला ठेवून काही वेळ राज्याच्या विकासासाठी वेळ द्यावा.

उद्योजकांची पूजा बांधण्याचा उपक्रम
माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे : महाराष्ट्रातील धडपडणारे, शून्यातून जग निर्माण करणाऱ्या उद्योजकांची पूजा बांधण्याचा हा गौरवास्पद उपक्रम आहे. ग्रामीण भागातील उद्योजक ३००-४०० कोटींचा व्यवसाय करत आहेत, याचे कौतुक आहे. गेल्या सहा दशकांमध्ये महाराष्ट्र केवळ राजकीय शक्तीने नाही तर उद्योजकांनी स्वतःच्या हिमतीने या राज्याला उभे केले आहे. उद्योजकांनी पुढे येऊन उद्योग सुरू केल्याशिवाय त्या प्रांतांची भरभराट होत नाही.
वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरी सातत्याने उंचावत आहे. त्यामुळे ‘मेडिकल हब’ होण्याच्या दिशेने महाराष्ट्र शाश्वत पावले टाकत आहेत. कुशल डॉक्टर, प्रशिक्षित मनुष्यबळाची मोलाची मदत या क्षेत्राला मिळत आहे. त्यातही उद्योजकांची साथ मिळाली आहे. राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री झालेले शरद पवार यांनी उद्योग वाढीसाठी पायाभूत सुविधा वाढविण्याचे कार्य केले. महाराष्ट्राच्या विकासात त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचे मोठे योगदान आहे.
महाराष्ट्र कोणत्या एका जाती-धर्माच्या कर्तृत्वाने उभा राहील नाही. तर, सर्व जाती-धर्माच्या कर्तृत्वावर उद्योजकांचा राज्याच्या वाढीत हातभार लागला आहे. सर्वधर्म समभाव हा या राज्याच्या मूळ गाभा आहे. राज्याच्या सत्तेवर अनेक सरकार येतील आणि जातील; पण शेकडो वर्षे जुन्या संस्था आहेत त्या राज्याच्या संपत्तीत भर घालत आहेत.

सेवा, उद्योगाची वाढ झाली पाहिजे
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण : महाराष्ट्र ६१ वर्षांचा होत असताना उद्योगांनी प्रचंड प्रगती केली यात काही शंका नाही. ग्रामीण भागात छोट्या पातळीवर काम सुरू केलेले व आज यशाच्या शिखरावर निघालेल्या या ‘महाब्रँड्स’चे मनःपूर्वक अभिनंदन करतो. आर्थिक, सामाजिक, राजकीय, वातावरण चांगले असल्यास राज्याची प्रगती होते. प्रत्येक राज्यात नवे उद्योग, सेवा केंद्र, माहिती तंत्रज्ञान कंपन्या येतील यासाठी स्पर्धा आहे. त्यामध्ये आपण खूप मोठे आहोत, अशी मानसिकता ठेवणे योग्य नाही.
केंद्र सरकारने उद्योग वाढीसाठी सवलत देण्यासाठी प्रॉडक्टिव्हिटी लिंक इन्सेंटिव्ह (पीएलआय) ही योजना काही वर्षांपूर्वी सुरू केली आहे. त्यात वाढीव उत्पादनात निर्यातीवर सरकार पाच ते सात टक्के अनुदान देणार आहे, ही २.३४ लाख कोटी रुपयांची योजना आहे. देशात १४ ठिकाणी ही योजना राबविली आहे. पण, महाराष्ट्रात ही योजना आली नाही, याची मला चिंता वाटते. याचा राज्यातील नेतृत्वाचे गांभीर्याने विचार करावा.
महाराष्ट्राचा विभागीय औद्योगिक असमतोल दूर झाला पाहिजे, हे उद्याच्या महाराष्ट्रापुढील मोठे आव्हान आहे. भविष्यात रोजगारासाठी फक्त शेतीवर अवलंबून राहून चालणार नाही तर, सेवा आणि उद्योगाची वाढ झाली पाहिजे.
मुंबई ही आता देशाची आर्थिक राजधानी राहिलेली नाही. ती दिल्ली परीक्षेत्राकडे स्थलांतरित होत आहे, असे परदेशातील काही संस्थांच्या अहवालात नमूद केले आहे. महाराष्ट्रात प्रचंड क्षमता आहे, पोषण वातावरण, शासकीय धोरण, वित्तीय पुरवठा व धोका पत्करण्याची क्षमता याची सांगड घालून उद्योगांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.

उद्योगांसाठी पोषक वातावरण
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : समाजात चांगले सुरू असलेले कार्य लोकांसमोर आणण्याचे काम सातत्याने ‘सकाळ’ करत आहे. शेती, शिक्षण, बांधकाम यासह सर्व क्षेत्रात वेगाने काम सुरू आहे. यात महाराष्ट्रातील उद्योगांमध्ये ‘ब्रँड’ असलेल्यांचा सन्मान केला. व्यक्तीला संस्था मोठी करते, नंतर व्यक्ती संस्थेला मोठी करतो. २१व्या शतकात गुणवत्ता व विश्वासार्हता याला पैशांपेक्षा जास्त मोल आहे. पैसा वित्तीय संस्थेतून मिळतो, पण विश्वास, समृद्धी हे आपोआप मोठे होत नाहीत त्यासाठी प्रामाणिक कष्टाची जोड आवश्यक असते. पायाभूत सुविधा, उद्योग यामध्ये महाराष्ट्र पुढे आहे. ही उत्तम ‘इकोसिस्टीम’ महाराष्ट्रात आहे. उद्योजकांनी एकत्र प्रयत्न केल्याने विकास होतो. महाराष्ट्र ‘स्टार्टअप’ची राजधानी आहे. चीननंतर भारतात ‘स्टार्टअप’ आहेत. उद्योजकता व कल्पकता याचा सुंदर संगम आपल्या राज्यात दिसून येतो. कृषी क्षेत्रातील ‘स्टार्टअप’ आता पुढे येत आहेत. यामुळे उद्योगांसाठी पोषक वातावरण तयार झाले. उद्योगाच्या माध्यमातून देश आणि राज्याचा वेगाने विकास होत आहे. विकासाला हातभार लावणाऱ्या प्रमुख उद्योजकांचा गौरव करून ‘सकाळ’मुळे ते समाजासमोर आले. चांगल्यातून चांगले करण्याचा प्रयत्न आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top