
World Cancer Day : ‘सिटी स्कॅन’मधून कर्करोगाचे निदान
पुणे - ‘थंडी वाजू लागली. भयंकर ताप आला. कोणताही वास येत नव्हता की, चव लागत नव्हती. डॉक्टरांच्या (Doctor) म्हणण्याप्रमाणे कोरोना चाचणी (Corona Test) पॉझिटिव्ह आली. ही घटना बरोबर सहा महिन्यांपूर्वीची. पाठोपाठ सिटी स्कॅन (CT Scan) करण्याचा सल्ला दिला. त्यातून ‘एचआरसीटी स्कोअर कळालाच, पण त्याच स्कॅनमधून स्तनाच्या कर्करोगाचे निदान (Diagnosis of Cancer) झाले. मग काय, पहिली कोरोनाविरोधातील लढाई पंधरा दिवसांमध्ये जिंकली. आता, कर्करोगाशी निकराने लढत आहे,’’ असं जेमतेम वयाच्या पस्तीशीत असलेली लक्ष्मी आत्मविश्वासाने बोलत होती.
आज शुक्रवार (ता. ४) असलेल्या जागतिक कर्करोग दिनानिमित्त ‘सकाळ’ने लक्ष्मी यांच्याशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, ‘‘खोकला वाढला. छाती भरू लागली. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. सुरुवातीला रक्तातील ऑक्सिजनची पातळी ९८ टक्के होती. ती दोन दिवसांत ९२-९३ टक्के झाली. डॉक्टरांनी दिलेला इन्हेलर घेऊनही फारसे बरे वाटत नव्हते. दोन दिवसांमध्येच डॉक्टरांनी सिटी स्कॅन काढण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे रुग्णालयात जाऊन स्कॅन केला. त्यात ‘एचआरसीटी स्कोअर १५ होता. मात्र, स्तनामध्ये गाठीसदृष्य काहीतरी दिसत असल्याचे डॉक्टरांना जाणवले. डॉक्टरांनी सुरुवातीला कोरोनाचा उपचार पूर्ण केला. त्यासाठी दोन आठवडे लागले. त्यानंतर स्तनातील गाठी तपासल्या, तर त्यात कर्करोग असल्याचे निदान झाले. पहिल्या-दुसऱ्या टप्प्यातच निदान झाले. कोरोना झाला नसता, तर स्कॅन करण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे निदान झाले नसते.’’
‘प्रोलाईफ कॅन्सर सेंटर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट’चे कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. सुमीत शहा म्हणाले, ‘‘कर्करोगाचे लवकर म्हणजे त्याची अर्धी लढाई जिंकल्यासारखी आहे. मात्र, देशात ७० ते ८० टक्के रुग्णांचे निदान उशिरा हते. कर्करोगाचे निदान लवकर झाल्यास रुग्ण पूर्णतः बरा होण्याची शक्यता वाढते. त्यासाठी आवश्यकता असते, ती कर्करोगावर प्रभावी उपचार करणारी सर्वंकष व्यवस्था. लवकर निदान झाल्याने छोटी शस्त्रक्रिया करून रुग्ण कर्करोगमुक्त होऊ शकतो. उशिरा निदान झाल्याने त्या अवयवातील कर्करोग वाढतो. त्यामुळे केमोथेरपी, रेडिएशन अशा उपचार पद्धतीचे गरज निर्माण होते.’’
‘उपचारातील दरी कमी करा’ अशी या वर्षीच्या कर्करोग दिनाची संकल्पना आहे. कर्करोगाचे लवकर निदान होण्यासाठी आपल्या शरीरात होणारे बदलांवर प्रत्येकाने बारकाईने लक्ष दिले पाहिजे. तोंडातील बरी न होणारी जखम, अचानक मोठ्या प्रमाणात कमी झालेले वजन, तोंडातून, शौचातून रक्त पडणे, स्तनामध्ये गाठी होणे ही कर्करोगाची ठळक लक्षणे आहेत. त्याबाबत नागरिकांनी जागृती असणे, ही काळाची गरज आहे. तसेच, डॉक्टरांनीही या लक्षणांना गांभीर्याने घेऊन योग्य प्राथमिक तपासण्यांचा सल्ला दिला पाहिजे. त्यासाठी डॉक्टरांना कार्यशाळेतून अद्ययावत माहिती देण्यात येते, असेही डॉ. शहा यांनी स्पष्ट केले.
लवकर निदानाचे फायदे...
पहिल्या-दुसऱ्या टप्प्यात निदान होणारा रुग्ण बरा होण्याचे प्रमाण ७० ते ९५ टक्के असते
तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात निदान झाल्यास बरे होण्याचे प्रमाण १० ते ३० टक्क्यांपर्यंत कमी होते
लवकर निदान झाल्यास केमोथेरपी, रेडिएशन अशा अतिरिक्त उपचारांची गरज लागत नाही
आकडे काय सांगतात?...
देशात कर्करोगाचे २५ ते ३० लाख रुग्ण आढळतात
दरवर्षी आठ लाख नवीन रुग्णांचे निदान होते
कर्करोगाने दरवर्षी चार लाख रुग्णांचा मृत्यू होतो
मृत्यू होणाऱ्या ७० टक्के रुग्णांचे वय ३० ते ६९ वर्षांपर्यंत असते
प्रत्येक एक लाख लोकसंख्येत १०० ते १३० कर्करोगाचे रुग्ण आढळतात