राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता

राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता

पुणे, ता. ४ : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर (पीडीसीसी) सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने सलग पाचव्यांदा एकहाती सत्ता मिळविली आहे. या बॅंकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांपैकी १६ जागांवर बाजी मारत राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा या बॅंकेवर निर्विवाद वर्चस्व स्थापित केले आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाने चार दशकांच्या खंडानंतर यंदा पहिल्यांदाच एका जागेवर विजय मिळवत, संचालक मंडळात खाते उघडले आहे. भाजपचे प्रदीप कंद हे क वर्ग मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे हे तीन मंत्री, संग्राम थोपटे, संजय जगताप, दिलीप मोहिते पाटील हे तीन आमदार आणि बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष रमेश थोरात यांच्यासह ११ संचालक या बॅंकेवर पुन्हा एकदा निवडून गेले आहेत. शिरूरचे आमदार अशोक पवार, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्यासह आठ जण यंदा पहिल्यांदाच या बॅंकेचे संचालक झाले आहेत. अन्य दोघे जण हे काही कार्यकाळाच्या खंडानंतर पुन्हा एकदा संचालक झाले आहेत.
जिल्हा बॅंकेच्या २०२१ ते २०२६ या कार्यकाळासाठीच्या संचालक निवडीसाठी २९ नोव्हेंबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवसापर्यंत १४ जण बिनविरोध झाले होते. उर्वरित सात जागांसाठी २ जानेवारी २०२२ ला मतदान झाले. याची मतमोजणी मंगळवारी (ता. ४) करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद सोबले यांनी याआधी बिनविरोध झालेल्या सर्वांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली आणि निवडणुकीत विजयी उमेदवार जाहीर केले.
यंदा पहिल्यांदाच जिल्हा बॅंकेवर निवडून गेलेल्यांमध्ये अशोक पवार, प्रदिप कंद, विकास दांगट, संभाजी होळकर, सुनील चांदेरे, प्रवीण शिंदे, निर्मला जागडे आणि पूजा बुट्टे यांचा समावेश आहे. दत्तात्रेय येळे आणि ज्ञानोबा दाभाडे हे दोघे जण एक किंवा दोन कार्यकाळाच्या खंडानंतर पुन्हा एकदा संचालक झाले आहेत. या निवडणुकीत बॅंकेचे मावळते संचालक प्रकाश म्हस्के (हवेली), आत्माराम कलाटे (मुळशी) या दोन माजी अध्यक्षांसह सुरेश घुले (हवेली) या तीन संचालकांना पराभव पत्करावा लागला आहे.
निवडणूक झालेल्या सात जागांपैकी सहा जागांवर मतदारांनी ज्येष्ठांना नाकारले असून नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने सहकार पॅनेल रिंगणात उतरविले होते. या पॅनेलमध्ये हवेली तालुका अ वर्ग मतदारसंघात अधिकृत उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्याच दोन उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली. या लढतीत बॅंकेचे माजी अध्यक्ष प्रकाश म्हस्के यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. येथून राष्ट्रवादी काँग्रेसचेच विकास दांगट अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. शिरूरमधून सहकार पॅनेलचे उमेदवार आमदार अशोक पवार, मुळशीतून सुनील चांदेरे विजयी झाले आहेत. चांदेरे यांनी बॅंकेचे विद्यमान संचालक व माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे यांचा पराभव केला आहे.
एकूण जागांपैकी १३ जागा अ वर्ग तालुका मतदारसंघ, दोन जागा महिला राखीव, ब, क व ड मतदारसंघ प्रत्येकी एक, अनुसूचित जाती-जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि भटक्या जाती, विमुक्त जमाती प्रत्येकी एक अशा एकूण २१ जागांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क वर्ग मतदारसंघ आणि मुळशी तालुका अ वर्ग मतदारसंघ निवडणूक खूपच प्रतिष्ठेची केली होती. यापैकी मुळशीची जागा जिंकण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार पॅनेलला यश आले आहे. माजी अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे हे ड वर्ग मतदारसंघातून आणि निर्मला जागडे व पूजा बुट्टे पाटील या महिला राखीव मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. सर्व पक्षांच्या सहकार्यामुळे मी जिल्हा बॅंकेवर बिनविरोध निवडून गेलो आहे. त्यामुळे मी कोण्या एका पक्षाचा उमेदवार म्हणता येणार नाही, असे इंदापूर तालुका अ वर्ग मतदारसंघातून बिनविरोध झालेले अप्पासाहेब जगदाळे यांनी सांगितले.

थोरात ज्येष्ठ तर, बुट्टे तरुण
जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात हे सलग आठव्यांदा बॅंकेवर निवडून गेले आहेत. ते १९८२ पासून बॅंकेवर सलग निवडून येत आहेत. सध्या त्यांनी वयाची सत्तरी ओलांडली आहे. वय आणि अनुभव या दोन्ही बाबतीत रमेश थोरात हे जिल्हा बॅंकेचे सर्वात ज्येष्ठ संचालक ठरले आहेत. दरम्यान महिलांसाठी राखीव असलेल्या मतदारसंघातून निवडून आलेल्या पूजा बुट्टे पाटील या सर्वात तरुण संचालक ठरल्या आहेत. अगदी वयाच्या चाळिशीत त्यांना संचालकपदावर काम करण्याची संधी मिळाली आहे.

पक्षिय बलाबल
राष्ट्रवादी काँग्रेस १६
काँग्रेस ०२
भाजप ०१
अपक्ष ०२
(टीप ः दोन अपक्षांपैकी प्रत्येकी एक भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसशी निगडित)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com