लतादीदींच्या आठवणी पुणेकरांसाठी अविस्मरणीय...

लतादीदींच्या आठवणी पुणेकरांसाठी अविस्मरणीय...

Published on

पुण्यात नेहरू स्टेडियममध्ये १५ मे १९८७ रोजी लतादीदींचा भव्य कार्यक्रम झाला होता. हा कार्यक्रम आजही पुणेकरांच्या स्मरणात आहे. तसेच लतादींदीच्या अनेक आठवणी पुणेकरांसाठी अविस्मरणीय आहेत.
-उल्हास काळोखे, माजी आमदार

बुधवार पेठेतील जोगेश्‍वरी मंदिरासमोरील काकिर्डे बोळात लतादीदींचे वडील दीनानाथ मंगेशकर यांचे परममित्र दादासाहेब जेस्ते राहत असत. दीनानाथ यांच्या अखेरच्या प्रतिकूल परिस्थितीत जे मित्र मंगेशकर कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले, त्यापैकी दादासाहेब हे एक होते! लतादीदींनी स्वतः त्याचा उल्लेख एका लेखात केला आहे. दीदी पुण्यात आल्या की, त्यांना भेटल्याशिवाय जात नसत.

मी व माझे कुटुंबीय त्यावेळी दादासाहेब यांच्या घराच्या परिसरात राहत होता. त्या वेळी माझे वय सात-आठ वर्षांचे होते. लतादीदींची मोटार आली की, ती बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरत असे. आजूबाजूचे स्त्री-पुरुष त्यांना पाहण्यासाठी गर्दी करत असत. आम्ही मुले कुतूहलाने त्यांच्या मोटारीजवळ जात असे. त्या हसत-हसत गाडीतून उतरत आणि आमच्या डोक्‍यावर प्रेमाने हात ठेवत, ही आठवण आजही माझ्या स्मरणात आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे काकासाहेब गावडे विश्‍वस्त होते. त्यांची व दीनानाथ यांची खास मैत्री होती. दीदी पुण्यात आल्या की, त्यांनाही भेट असत. यामुळे दीदींना दगडू हलवाई गणपती उत्सवाचा जवळून परिचय व त्याबद्दल आपुलकी होती.

१९७४ मध्ये मी शिवसेनेचा नगरसेवक नगरसेवक होतो. त्यावेळी तात्या गोडसे यांनी मला गणपती मंडळावर विश्‍वस्त म्हणून घेतले. पुढे १९८५ मध्ये कसबा मतदारसंघाचा आमदार झालो. १९८३ मध्ये गणपती मंदिर बांधून झाल्यानंतर श्रीमंत शंकराचार्य यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली.

उत्सवाच्या दोन महिने आधी डेकोरेशन, देखाव्याचे काम सणस मैदान (सारसबाग) परिसरात चालत असे. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना त्यांचे मित्र श्री. रानडे हे सजावट पाहण्यासाठी घेऊन आले होते. मी त्यांना सर्व सजावटीबाबत माहिती दिली. त्यानंतर लतादीदींना गणपती महापूजेच्या उत्सवात निमंत्रित करण्याचा प्रस्ताव मी त्यांच्यासमोर मांडला. त्यानंतर लतादीदी यांच्या हस्ते उत्सवात गणपती महापूजा, महाआरती झाली. त्यांना फारच आनंद झाला. त्या वेळी मंडपाच्या आजूबाजूला प्रचंड गर्दी झाली होती आणि मोठ्या संख्येने भाविक या सोहळ्यात सहभागी झाले होते.

उत्सव झाल्यानंतर मी ट्रस्टचे अध्यक्ष
तात्या गोडसे, शंकरराव सूर्यवंशी, मामा रासने, बुवा रासने यांना घेऊन मंगेशी अपार्टमेंटमध्ये पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना भेटण्यासाठी गेलो. तात्या गोडसे यांनी पं. हृदयनाथ यांना सांगितले की, लतादीदींचा जाहीर कार्यक्रम ट्रस्टने नेहरू स्टेडियम येथे करण्याचा निश्‍चित केले आहे. तुम्ही दींदाला आमचा निरोप देऊन कार्यक्रमासाठी त्यांची वेळ मागण्याची विनंती केली.
पं. हृदयनाथ देखील थोड्या वेळी विचार पडले. त्यानंतर ते म्हणाले की, मला पंधरा दिवस वेळ द्या. मी दीदीबरोबर बोलतो. तसेच ते माझ्याकडे पाहत म्हणाले की, आमदार तुम्ही मुंबईला नेहमी येता. मला दहा-बारा दिवसांनी फोन करा. त्यांनतर काही दिवसांनी लतादीदींना भेटण्यासाठी सकाळी मी प्रभूकुंज येथे गेलो. मी, पं. हृदयनाथ, लतादीदी आमची सर्वांची चर्चा झाली. मला कार्यक्रम कसा, कुठे, केव्हा करावयाचा याची माहिती दीदींनी विचारली. त्यानंतर १५ मे १९८७ रोजी नेहरू स्टेडियममध्ये दींदीचा भव्य कार्यक्रम झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com