
व्यवसाय प्रशिक्षण परिषदेचे विलीनीकरण
पुणे, ता. २० : महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषदेचे आता महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळामध्ये लवकरच विलिनीकरण होणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली आहे.
राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्या आधिपत्याखाली राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषदेची स्थापना १९८४च्या निर्णयानुसार करण्यात आली. राज्यात व्यवसाय प्रशिक्षणाची व्याप्ती वाढविण्यासाठी अल्प मुदतीचे व्यवसाय अभ्यासक्रम चालविणे, तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता देणे, विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मूल्यमापन करून प्रमाणपत्र देणे, अशी जबाबदारी महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषदेची आहे. परंतु व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत असलेल्या या दोन्ही संस्थांच्या कामकाजाचे स्वरूप हे बहुतांशी सारखेच आहे. अल्प मुदतीच्या कौशल्य अभ्यासक्रमांना मान्यता, कौशल्य प्रशिक्षण, मूल्यमापन व संस्थेतर्फे प्रमाणपत अशी समान स्वरूपाची जबाबदारी या दोन्ही संस्थांची आहे. दरम्यान, राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषदेच्या नियामक परिषदेच्या ३१ मे २०२१ मध्ये झालेल्या बैठकीत परिषदेचे विलीनीकरण राज्य कौशल्य विकास मंडळामध्ये करण्याचा ठराव करण्यात आला. त्यानुसार संचालनालयाअंतर्गत एकाच उद्दिष्टांसाठी कार्यरत या दोन्ही संस्थांचे विलीनीकरण करून, राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषद विसर्जित करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. मंत्रिमंडळाच्या ८ डिसेंबर २०२१मध्ये झालेल्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार हे विलीनीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे परिषदेच्या अखत्यारितील सर्व अभ्यासक्रम, व्यवसाय प्रशिक्षण संस्था, कौशल्य चाचणी संस्था, निरीक्षण संस्था मंडळाच्या अखत्यारित आणण्यात येतील. परिषदेची निर्धारित कार्ये मंडळामार्फत राबविण्यात येणार आहेत.
आदेशात काय म्हटले आहे?
परिषदेच्या ताब्यात असलेल्या सर्व जडवस्तू तसेच इतर सर्व मालमत्ता मंडळाकडे हस्तांतरित करावी लागणार आहेत. परिषदेकडे असलेली दायित्वे ही मंडळाकडे तपासणी करून त्यांच्याकडे हस्तांतरित रकमेतून अदा करण्यात यावीत, परिषदेमध्ये मंजूर असलेली व कार्यरत असलेली सर्व कंत्राटी पदे मंडळामध्ये समायोजित करण्यात यावीत व त्यांचे वेतन व भत्ते मंडळाच्या निधीतून अदा करण्यात यावी, असे आदेश कौशल्य विभागाचे कार्यासन अधिकारी प्रदिप शिवतरे यांनी अध्यादेशाद्वारे दिले आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..