
मुंबईला साहित्य पोचविण्यासाठी खंडणी मागणारा जेरबंद
मुंढवा, ता. ३१ ः पुण्यातून मुंबईच्या घरी घरगुती साहित्य न पोहोचविता टेम्पोच्या लोकेशनसाठी
पाच हजार रुपयांची अधिकची मागणी करणाऱ्याला जेरबंद केले असून, चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अभिनव अविनाश वर्मा (वय ३०, रा. केशवनगर, मुंढवा) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पोचालक रामदास शेलार, विजय पाटील, अश्विन रायकर (वय २७, सर्व रा. धायरीगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, अश्विन रायकर याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले की, अभिनव वर्मा यांनी त्यांचे घरगुती सामान मुंबईतील घरी हलविण्यासाठी सन लाइफ पॅकर्स अँड
मूव्हर्स व धारेश्वर कार्गो पॅकर्स अँड मूव्हर्स यांना दिले. त्यांनी २९ जानेवारी रोजी दुपारी चार वाजता केशवनगर येथील
घरातून ९ लाख १० हजार रुपयांचे घरगुती साहित्य टेम्पोत भरून घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी त्यांच्या मुंबईतील
घरी साहित्य पोहचले नसल्याने त्यांनी विचारणा केली असता टेम्पोचे लोकेशन पाहिजे असल्यास आणखी ५ हजार रुपये द्यावे लागेल. पैसे दिले नाही तर तुमचे सामान विसरुन जा, अशी धमकी दिली. त्यानंतर वर्मा यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक
अश्विनी भोसले अधिक तपास करीत आहेत.
----------------------------
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..