
‘पिफ’मध्ये तेंडुलकर स्मृती व्याख्यान
पुणे, ता. २५ ः पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र सरकारतर्फे आयोजित यंदाच्या विसाव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) काही विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याअंतर्गत ज्येष्ठ कवी, गीतकार, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते जावेद अख्तर ‘विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यान’ देणार आहेत. तर महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख उपस्थित राहणार आहेत.
‘पिफ’चे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. तीन मार्चला रोजी सायंकाळी ४:३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे उद्घाटन सोहळा होणार असून ‘नेबर्स’ चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात होईल. महोत्सवाच्या विशेष कार्यक्रमांमध्ये उर्दू कविता आणि साहित्यावर आधारित ‘सुखन’, ‘साऊंड इन फिल्म्स’ या विषयावरील कार्यशाळा व ‘सत्यजित रे आणि त्यांचा सिनेमा’ या विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती डॉ. पटेल यांनी दिली.
महोत्सवाच्या मराठी स्पर्धा विभागासाठी ‘आता वेळ झाली’, ‘गोदावरी’, ‘मीडियम स्पायसी’, ‘निवास’, ‘एकदा काय झाले’, ‘पोटरा’ आणि ‘तिचं शहर होणं’ या सात चित्रपटांची निवड झाली आहे. तर महोत्सवादरम्यान प्रीमिअर होणाऱ्या मराठी चित्रपटांमध्ये ‘वर्तुळ’, ‘अवकाश’, ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटोलॉजी’, ‘जननी’, ‘राख - सायलेंट फिल्म’, आणि ‘रंगांध’ या चित्रपटांचा समावेश आहे’, असे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी सांगितले. तर राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम म्हणाले, ‘‘महोत्सवादरम्यान ‘चित्रांजली’ या भित्तिचित्रे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सत्यजित रे यांचे ‘अगंतुक’, ‘देवी’ आणि ‘जलसागर’ हे तीन चित्रपट, पं. भीमसेन जोशी यांच्या स्मृतीत ‘गुळाचा गणपती’ व साहीर लुधियानवी यांच्या स्मृतीत ‘प्यासा’ हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. यासह एनएफएआयमध्ये झालेल्या संशोधनांवर आधारित कन्नड सिनेदिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांच्या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे.’’
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..