
संभाजीराजेंच्या पाठिंब्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन
पुणे, ता. २६ : मराठा आरक्षणासह समाजाच्या इतर मागण्यांसाठी छत्रपती संभाजीराजे मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा पुणे शहर व जिल्ह्याच्या वतीने शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शनिवारी आंदोलन करण्यात आले.
मराठा सेवा संघ, मराठा महासंघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, छावा संघटना, जिजाऊ प्रतिष्ठान तसेच मराठा समाजातील नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कुंजीर म्हणाले, ‘‘न्या. भोसले समितीच्या शिफारशी मान्य करून राज्य सरकारने ‘केजी ते पीजी’ शिक्षण मोफत करावे. राज्य मागासवर्ग आयोगाची पुनर्रचना करून त्यात मराठा समाजाच्या प्रतिनिधींचा समावेश करावा. मराठा समाज अनेक वर्षांपासून आरक्षणाच्या न्याय हक्कासाठी लढत आहे. अनेक सरकारे आली, परंतु कोणीही प्रत्यक्ष कृती करण्यावर भर दिला नाही. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामध्ये आरक्षणासह इतर मागण्या सरकारने पूर्ण कराव्यात. केंद्र आणि राज्य सरकारने मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये.’’
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सचिन आडेकर म्हणाले, ‘‘मराठा समाज भूलथापांना बळी पडणार नाही. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची नवीन कार्यकारिणी करून तरुणांना व्यवसायासाठी मदत करावी. तसेच, ‘सारथी’ संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करून नवीन कार्यकारी संचालक आणि संचालक मंडळाची नेमणूक करावी.’’
मराठा क्रांती मोर्चाचे अनिल ताडगे, प्रशांत धुमाळ, आबा जगताप, अरुण वाघमारे, मनोहर वाडेकर, प्रफुल्ल गुजर , मुकेश यादव, संतोष नानवटे, संजय शिरोळे, मुकेश यादव, कैलास पठारे, जालिंदर मगर, श्वेता घाडगे, सीमा महाडीक, प्राची दुधाणे, सारिका जगताप, दत्ता करंजकर, बाळासाहेब कडू, राकेश भिलारे, देविदास लोणकर, अभय ढमाले, गणेश नलावडे यांच्यासह इतर समाज बांधव आंदोलनात सहभागी झाले होते.
--------
मराठा समाजाच्या इतर प्रमुख मागण्या
छत्रपती शिवरायांचे मुंबईतील स्मारक उभारण्याबाबत तातडीने कार्यवाही व्हावी
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला चारशे कोटींचा निधी द्यावा
‘सारथी’ संस्थेवर मराठा समाजातील कार्यक्षम व्यक्तींची नेमणूक करावी
‘सारथी’ तारादुतांची नियुक्ती करण्यात यावी
कोपर्डी घटनेतील आरोपींना लवकर फाशीची शिक्षा द्यावी
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृहे सुरू करावीत
ईएसबीसी आणि एईबीसी प्रवर्गातील पात्र उमेदवारांना नियुक्त्या द्याव्यात
PNE22S46067
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..