रश्‍मी शुक्‍ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

रश्‍मी शुक्‍ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

Published on

पुणे, ता. २६ ः राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेससह विविध राजकीय पक्षांमधील महत्त्वाच्या नेत्यांचे फोन बेकायदेशीरपणे अभिवेक्षण (फोन टॅपिंग) करून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्‍ला व त्यांच्यासह इतर अधिकाऱ्यांविरुद्ध भारतीय तार अधिनियम कायदा कलम २६ प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे. शुक्‍ला सध्या हैदराबाद येथे ‘सीआरपीएफ’च्या अतिरिक्त पोलिस महासंचालक या पदावर कार्यरत आहेत.

शुक्‍ला या राज्य गुप्त वार्ता विभागात (एसआयडी) आयुक्त होत्या. त्यावेळी त्यांनी राजकीय नेत्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप करून त्यामधील संभाषण भाजप-सेना सरकारमधील वरिष्ठ नेत्यांना पुरविल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला होता. याप्रकरणी महाराष्ट्र विधीमंडळाच्या २०२१ च्या अधिवेशनात २०१५ ते २०१९ या पाच वर्षांच्या कालावधीमधील संपूर्ण फोन टॅपिंग प्रकरणी प्रश्‍न उपस्थित केला होता. संबंधित फोन टॅपिंग प्रकरणाची पडताळणी करण्यासाठी तत्कालीन पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय उच्च समिती स्थापन केली होती. संबंधित समितीने पाच वर्षांच्या कालावधीमधील संपूर्ण फोन टॅपिंगची पडताळणी केली. त्यावेळी या कालावधीमध्ये अनिष्ट राजकीय हेतूने लोकप्रतिनिधींचे फोन गैरपद्धतीने टॅप केले आहेत किंवा कसे ? याचा तपास समितीने केला. त्यामध्ये शुक्‍ला यांचा सहभाग असल्याचे तांत्रिक तपासामध्ये स्पष्ट झाले. त्यानुसार, उच्च समितीने याबाबतचा अहवाल राज्य सरकारकडे दिला होता.

शासनाने संबंधित अहवाल स्वीकारला. त्यामध्ये शुक्‍ला यांच्या कार्यकाळात बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केल्याचे नमूद केले होते. त्यामुळे शासनाने शुक्‍ला यांच्यासह इतर संबंधित व्यक्तींवर भारतीय तार अधिनियम कायदा कलम २६ प्रमाणे बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकाऱ्यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यावरुन गुन्हा दाखल केला आहे. शुक्‍ला यांनी पुण्यातील कार्यकाळातही पदाचा गैरवापर करून बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केल्याचे अहवालात म्हटले आहे. शुक्‍ला यांची पुणे पोलिस आयुक्त पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांना राज्य गुप्त वार्ता विभागाच्या (एसआयडी) आयुक्तपदी नेमणूक केली होती.

...असे आहे शुक्‍ला यांचे प्रकरण !
रश्‍मी शुक्‍ला या भारतीय पोलिस सेवेच्या (आयपीएस) १९८८ च्या तुकडीतील पोलिस अधिकारी आहेत. शुक्‍ला या राज्य गुप्तवार्ता विभागामध्ये (एसआयडी)
कार्यरत होत्या. त्यावेळी त्यांनी दहशतवादी कारवायांशी संबंधित अधिक तपास करण्यासाठी राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडून फोन टॅपिंग करण्यासाठीची परवानगी घेतली होती. त्याद्वारे त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेससह विविध राजकीय पक्षांमधील महत्त्वाच्या नेत्यांचे फोन टॅप केले. संबंधित कॉल रेकॉर्डिंग त्यांनी विरोधकांना पुरविल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे.

नाना पटोले "अमजद खान'', बच्चू कडू "निजामुद्दीन शेख''
नेत्यांचे फोन टॅप करताना त्यांच्या नावांसाठी कोडनेम वापरले होते. त्यामध्ये कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना "अमजद खान'', बच्चू कडू यांच्यानावासमोर निजामुद्दीन बाबू शेख, संजय काकडे यांचे नाव "अभिजित नायर'', आशिष देशमुख यांचे नाव "महेश साळुंके'' अशा प्रकारे विविध नेत्यांचे फोन टॅप करण्यासाठी खास कोडनेमचा वापर केल्याचे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com