
आरटीईअंतर्गत राखीव जागा प्रवेशास मुदतवाढ
पुणे, ता. २८ : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ (आरटीई) यानुसार खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास प्राथमिक शिक्षण संचालनालयाने १० मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या अंतर्गत राज्यातील नऊ हजार ८४ शाळांमधील तब्बल एक लाख एक हजार ९४२ जागांसाठी आत्तापर्यंत सुमारे एक लाख ७३ हजार २०९ अर्ज आले आहेत.
आरटीईनुसार आर्थिकदृष्ट्या वंचित आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिला जातो. यासाठी प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या प्रवेशाकरिता सध्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पालकांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी सोमवारपर्यंतची मुदत देण्यात आली होती. दरम्यान, राज्यात प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया फेब्रुवारीत टप्प्या-टप्प्याने सुरू झाली. पुणे जिल्ह्यातील २५ टक्के राखीव जागांसाठी प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया मागील आठवड्यात सुरू झाली आहे. असे असतानाही पुण्यासह अनेक जिल्ह्यातील पालकांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकलेला नाही. त्यामुळे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याची मागणी होत होती. याची दखल घेत प्राथमिक शिक्षण संचालनालयाने या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.
‘‘काही जिल्ह्यांमध्ये गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता शाळांची नोंदणी पूर्ण करण्यासाठी विलंब झाल्यामुळे पालकांना अर्ज भरता आले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पालकांना अर्ज भरण्यासाठी ही मुदतवाढ दिली आहे.’’
- दिनकर टेमकर, शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय
‘‘आरटीई अंतर्गत ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी किमान दोन आठवड्याची मुदत मिळणे आवश्यक आहे. हे अर्ज भरताना पालकांकडून नेट कॅफेवाल्यांकडून पैसे उकळले जात आहे. तसेच अर्ज भरताना प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याने वेळ वाया घालवावा लागत आहे. तसेच अर्ज भरताना तातडीने उपलब्ध वर्गवारी पीडीएफ स्वरूपात जाहीर करावी, म्हणजे शाळा जागा लपवत असतील, तर ते उघड होईल.’’
- मुकुंद किर्दत, समन्वयक,आप पालक युनियन
राज्यातील स्थिती
आरटीई शाळा : ९,०८४
प्रवेशाच्या जागा : १, ०१, ९४२
आलेले अर्ज : १,७३,२०९
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..