थकलेल्या डोळ्यांची पूजा करा आनंदाला फुटू दे अश्रूंचा झरा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थकलेल्या डोळ्यांची पूजा करा
आनंदाला फुटू दे अश्रूंचा झरा!
थकलेल्या डोळ्यांची पूजा करा आनंदाला फुटू दे अश्रूंचा झरा!

थकलेल्या डोळ्यांची पूजा करा आनंदाला फुटू दे अश्रूंचा झरा!

sakal_logo
By

‘‘आई-बाबा, तो बघा बगळ्यांचा थवा...’’ पानशेत धरणावरून उडणाऱ्या बगळ्यांकडे लक्ष वेधीत अजितने म्हटले आणि आई-बाबांच्या चेहऱ्यावर नकळत हसू फुलले.
‘‘बगळ्यांची माळफुले, अजूनि अंबरात.. भेट आपुली स्मरशी काय तू मनात..?’’ आईकडे बघत बाबांनी वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं गाणं म्हटलं आणि सत्तरीतील आई झकास लाजल्या.
‘‘बाबा, पलीकडून सूर्यास्त फार छान दिसतो. आपण तिकडे जाऊ.’’ असे म्हणून अजितने बाबांची व्हीलचेअर ढकलण्यास सुरवात केली तर स्नेहलने आईंची व्हीलचेअर ताब्यात घेतली. सुनंदन आणि आर्या ही चिमुरडी मुले त्यांच्यामागून हुंदडत येऊ लागली.
‘‘बाबा, सूर्यास्तावरून कोणतं रोमांटिक गाणं आठवतंय का?’’ अजितने असं म्हटल्यावर बाबा प्रसन्नपणे हसले. पश्‍चिमेला पसरलेली लालिमा आणि मावळतीकडे झुकलेला सूर्य पाहून आई- बाबांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले. अर्धा तास तिथे थांबल्यानंतर ते गेस्टहाऊसकडे निघाले. रस्त्यात गाडी थांबवून भाजलेली मक्याची कणसे व वाफाळता चहा अजितने आई- बाबांच्या हातात दिला. त्यानंतर ते गेस्टहाऊसला पोचले. अजितने बाबांना व स्नेहलने आईला व्हीलचेअरवरून रूममध्ये नेले.
‘‘आई-बाबा, रात्री काय जेवणार आहात? येथील मासे एकदम फक्कड लागतात. आताच ऑर्डर देऊ का?’’ अजितने विचारले.
‘‘अजित, अरे किती करशील आमचं? आता आमचं वय झालंय? आम्हा दोघांना चालताही येत नाही. आमच्यासाठी एवढा त्रास कशाला घेता?’’ डोळ्यांतील अश्रू लपवत बाबांनी म्हटले.
‘‘बाबा, मी लहान असताना तुम्ही मला खांद्यावर घेऊन जग दाखवलंय. सिनेमा, नाटक, सांस्कृतिक कार्यक्रम दाखवले. यात्रा- जत्रामधून फिरवलंय. आता तुमचं वय झालंय तर मी तुम्हाला बदललेलं जग दाखवलं तर त्यात विशेष काय? दोघेही अधून- मधून अशा मोकळ्या वातावरणात फिरलात, मस्तपैकी गाणी म्हणालात तर तुमचं मन व शरीरही ताजं- तवानं होतं. आणखी उमेद वाढते.’’ अजितने म्हटले.
‘‘अजित, तुझ्यासारखा मुलगा, स्नेहलसारखी सून, दोन गोड नातवंडं मिळणं, हे आमचं नशीब थोर असल्याची पावती आहे पण तुम्हालाही आयुष्य आहे.’’ आईने म्हटले.
‘‘आई-बाबा, तुम्ही आमच्यासाठी एवढं केलंय की मी जे करतोय, ते फार किरकोळ आहे. तुम्ही मला आयुष्यात उभं केलंय.
गरीबीत राहूनही तुम्ही मला दुःखाची झळ कधीच पोचू दिली नाही, हे उपकार मी कसं फेडू.’’ अजितने म्हटलं.
‘‘आजी, चार डोक्याच्या राक्षसाची गोष्ट सांग ना.’’ आर्यानं हट्ट धरला मग आईने दोन्ही नातवंडांना कुशीत घेत, गोष्ट सांगू लागली. थोड्यावेळाने आई-बाबांसह सगळेजण डायनिंग हॉलमध्ये आले. शेजारच्या टेबलवरून मनोज सगळं बघत होता. नकळत त्याच्याही डोळ्यातही अश्रू तरळले.
जेवणानंतर त्याने अजितला गाठले.
‘‘तुम्ही खरंच श्रावणबाळ आहात. अलीकडच्या काळात थकलेल्या आई-वडिलांची कोण एवढं काळजी घेतं.?’’ मनोजने म्हटले. त्यावर अजित म्हणाला, ‘‘त्यात फार विशेष काही नाही. हे मी माझं कर्तव्य समजतो. आम्ही दर महिन्यातील पहिल्या रविवारी आई-बाबांना दूरवर फिरायला नेतो. एका रविवारी नाटक किंवा सिनेमाला जातो. एखाद्या रविवारी जवळच्या बागेत त्यांना फिरायला नेतो. घरीही आम्ही त्यांची अशीच काळजी घेतो. त्यामुळे दोघांचीही मने तजेलदार राहतात आणि तब्येत ठणठणीत राहते.’’ हे ऐकून राहुलच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहायला लागले.
अजित म्हणाला, ‘‘आई- बाबांचं वय झालंय, त्यांना चालता येत नाही, गर्दीत कुठे न्यायचं, लोकं काही म्हणतील? असा विचार कधीही माझ्या मनात येत नाही. दोघांनाही आनंद मिळावा, एवढीच अपेक्षा असते.’’
अजितचं बोलणं ऐकून राहुलला एकदम गलबलून आलं. तातडीने गेस्ट हाऊस सोडून, तो चारचाकीतून पुण्याकडे निघाला.
‘‘आई-बाबा, मी तुम्हाला वृद्धाश्रमात ठेवलंय, याबद्दल मला माफ करा. तुम्हाला न्यायला मी येतोय.’’ असे म्हणून तो ढसाढसा रडू लागला.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..