
‘पीएमआरडीए’ नियोजन समितीच्या बैठकीत प्रारूप आराखडा सादर
पुणे, ता. २८ : प्रारूप विकास आराखड्यावरील दाखल हरकती सूचनांवर सुनावणी नेमलेल्या नियोजन समितीची सोमवारी (ता. २८) पहिली बैठक झाली. या समितीतील सदस्यांनी प्रारूप आराखड्याचे सादरीकरण केले. सुनावणीसाठीचा कार्यक्रम निश्चित करून ‘पीएमआरडीए’ने सादर करावा, अशा सूचना यावेळी नियोजन समितीने दिल्या. दरम्यान, हरकती व सूचना दाखल करणाऱ्या प्रत्येकाला सुनावणीकरिता हजर राहण्यासाठी नोटीस पाठवण्यात येणार आहे. मुख्यत: पोस्टातून, मोबाईलवर मेसजद्वारे, ई-मेलवर तसेच गावात प्रत्यक्ष नोटीस पाठवण्यात येणार आहे, असे ‘पीएमआरडीए’चे आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी सांगितले.
‘पीएमआरडीए’कडे ६१ हजार हरकती दाखल झाल्या आहेत. आकुर्डीतील ‘पीएमआरडीए’च्या कार्यालयात नियोजन समितीच्या झालेल्या बैठकीला तानाजी सावंत, अजित आपटे, डॉ. राजेंद्र जगदाळे, राजेंद्र पवार, सुधाकर नांगनुरे, डॉ. राहुल कराळे आदी सदस्य प्रत्यक्ष व ऑनलाइन सहभागी झाले होते.
डॉ. दिवसे म्हणाले, ‘‘पीएमआरडीएने दोन ऑगस्ट २०२१ रोजी प्रारूप विकास आराखडा जाहीर केला होता. त्यावर तब्बल ६१ हजार हरकती दाखल झाल्या आहेत. नियोजन समिती सदस्य येत्या काही महिन्यात या हरकतींची पडताळणी करतील. त्यामुळे हरकती नोंदविणाऱ्या प्रत्येक सुनावणीबाबत नोटीस पाठवण्याची प्रक्रिया येत्या दोन ते चार दिवसात सुरू करण्यात येईल. हरकती, सूचना दाखल करणाऱ्या प्रत्येकाला सुनावणीसाठी हजर राहण्याची तारीख देण्यात येणार आहे. पुढील चार महिन्यांत या सुनावण्या घेतल्या जाणार आहेत.’’
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..