
पुण्यात राज्यपालांविरोधात विविध ठिकाणी आंदोलन
पुणे, ता. २८ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या विरोधात आज शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन करून त्यांचा निषेध केला. तसेच राज्यपालांनी त्वरित माफी मागावी अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला.
शिवसेनेने शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस शाळेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर निदर्शने केली. यावेळी शहराध्यक्ष संजय मोरे, गजानन थरकुडे, नगरसेवक संजय मोरे, विशाल धनवडे, नगरसेविका पल्लवी जावळे, गजानन पंडित, राजेंद्र शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.
राज्यपाल कोश्यारी यांनी शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला. महाराजांना कायम दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न कायमच भाजप करत आहे. भाजपने कोश्यारी यांच्या पदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी मोरे यांनी केली.
काँग्रेसने एसएसपीएमएस शाळेसमोर आंदोलन केले. शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले, ‘‘राज्यपालांनी केलेले वक्तव्य हा महाराजांचा आणि देशाचा अपमान केला आहे. ते वारंवार वादग्रस्त विधाने करत असून, मोदी सरकार त्यांची पाठराखण करीत आहे. माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, गटनेते आबा बागूल, नगरसेवक अरविंद शिंदे, कमल व्यवहारे, संजय बालगुडे आदी उपस्थित होते.
तसेच हडपसर येथे प्रभाग क्रमांक २३ येथे शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचे प्रयत्न असताना भाजपकडून त्यास नकार दिला जात असल्याने त्याविरोधातही आंदोलन करून महापालिकेतील सत्ताधारी भाजपचा निषेध केला. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, अंकुश काकडे, नगरसेवक योगेश ससाणे, प्रदीप देशमुख आदी उपस्थित होते. तसेच महाविकास आघाडीतर्फे शनिवारवाड्यावरून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे कटआऊट खाली फेकून देण्यात आले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..