शहरात ‘ओम नमः शिवाय’चा जप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहरात ‘ओम नमः शिवाय’चा जप
शहरात ‘ओम नमः शिवाय’चा जप

शहरात ‘ओम नमः शिवाय’चा जप

sakal_logo
By

पुणे, ता. १ ः महाशिवरात्रीनिमित्त शहरातील विविध मंदिरात आकर्षक सजावटी, फुलांची आरास, विद्युत रोषणाई, मध्यरात्रीपासूनच धार्मिक विधींना सुरवात, सकाळपासून शहरातील वेगवेगळ्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची लागलेली रांग व त्यात ‘ओम नमः शिवाय’ असा जप करताना भाविक अशा या मंगलमय वातावरणात शहरात महाशिवरात्री साजरी करण्यात आली.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून मंदिरे बंद असल्याने भाविकांना महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी बाहेर पडता आले नव्हेत. मात्र, यंदा सर्व मंदिरे खुली असल्याने महाशिवरात्री मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी झाली. या निमित्त कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवा दत्त मंदिर, ओंकारेश्वर मंदिर, पाताळेश्र्वर, नागेश्र्वर, सोमेश्वर, तुळशीबाग राममंदिर, मृत्युंजयेश्वर मंदिर यांसह पेठा व उपनगरांमध्ये विविध मंदिरांत देखावे, साजसजावटी, वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या काढण्यात आल्या व पिंड साकारण्यात आल्या होत्या. मंदिरांमध्ये दिवसभर अभिषेक, कीर्तन, हवन, महाप्रसाद असे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. भाविकांना उपवासाचे फराळ, फळे प्रसाद स्वरूपात वाटण्यात आले.
पेशवेकालीन तुळशीबाग राममंदिरात महाशिवरात्रीनिमित्त महारुद्र अभिषेक श्रीरामजी संस्थान तुळशीबागच्या वतीने पेशवेकालीन तुळशीबाग राम मंदिर परिसरात महाशिवरात्रीनिमित्त सुमारे १५० वर्षांपूर्वीच्या पुरातन शंकराच्या मंदिरात महारुद्र अभिषेक पूजेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थानचे कार्यकारी विश्वस्त रामदास तुळशीबागवाले यांच्या हस्ते महारुद्र अभिषेक करण्यात आला. यावेळी संस्थानचे भरत तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, शिशिर तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले आदी उपस्थित होते. आराध्ये गुरुजी यांसह ब्रह्मवृंदांनी पौरोहित्य व मंत्रपठण केले. दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा तुळशीबागेत महाशिवरात्रीनिमित्त धार्मिक कार्यक्रम उत्साहात होत असल्याने भाविकांनी देखील दर्शनाकरिता हजेरी लावली होती.

चक्क्याची पिंड
बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात महाशिवरात्री निमित्त ट्रस्टच्या वतीने ५१ किलो चक्क्याची पिंड साकारली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी देखील यात सहभाग घेतला होता. याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रुकारी, अ‍ॅड. पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई, अ‍ॅड. रजनी उकरंडे, युवराज गाडवे, अ‍ॅड. प्रताप परदेशी, अ‍ॅड. शिवराज कदम जहागीरदार, महेंद्र पिसाळ आदी उपस्थित होते. यावेळी प्रमोद भगवान, लता भगवान, लीना भागवत यांनी शंकराचा मुखवटा आणि मंदिरातील सेवक व पुजारी पुरुषोत्तम वैद्य, उमेश धर्माधिकारी, युवराज पवार, चंद्रकांत कासार, लक्ष्मीबाई पत्की, प्रभावती नांगरे, वैभव निलाखे, ॠषिकेश अभंग, सोमनाथ स्वामी यांनी संपूर्ण पिंड व सजावट तीन तासात साकारली. यामध्ये द्राक्षे, विविध फळे, गुलाबाच्या पाकळ्या, बेल, विविध फुले वापरून पिंडीवर आकर्षक सजावट करण्यात आली.