मलिकांना देशद्रोही ठरविण्याचा नादात दरेकरांनी बदलली दोनदा भूमिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मलिकांना देशद्रोही ठरविण्याचा नादात दरेकरांनी बदलली दोनदा भूमिका
मलिकांना देशद्रोही ठरविण्याचा नादात दरेकरांनी बदलली दोनदा भूमिका

मलिकांना देशद्रोही ठरविण्याचा नादात दरेकरांनी बदलली दोनदा भूमिका

sakal_logo
By

पुणे, ता. १ ः ‘नवाब मलिक हे देशद्रोही आहेत’ असे वक्तव्य केल्यानंतर पत्रकारांनी पत्रकार परिषदेत प्रतिप्रश्‍न विचारताच आपल्याच वक्तव्यावरून कोलांटीउडी मारण्याची वेळ विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर आली आणि ‘मलिक देशद्रोही नाहीत, ज्यांच्याकडून जमीन घेतली ते देशद्रोही आहेत’ असा खुलासा केला, पण दरेकरांच्या लेखी निवदेनात मलिक यांचा देशद्रोही असाच उल्लेख असल्याचे समोर आले. त्यावरून पुन्हा प्रश्‍न विचारताच ‘माझी चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद, मलिक देशद्रोहीच आहेत’ असे सांगत सारवासारव केली, पण पाच मिनिटांत दोन वेळा भूमिका बदलण्याची नामुष्की दरेकरांवर आली.

भाजपच्या शहर कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रवीण दरेकर बोलत होते. शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी आमदार बापू पठारे आदी यावेळी उपस्थित होते.

प्रवीण दरेकर म्हणाले, ‘‘नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर ते साधूसंत असल्यासारखे वातावरण राज्यातील सत्ताधारी करत आहेत. महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करत आहेत. केंद्र सरकार सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप करत आहेत, पण एकाही प्रकरणात भाजपचा हात नाही. उलट शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड यांनी पूजा चव्हाण केस दाबली हा सत्तेचा गैरवापर आहे.’’

नवाब मलिक प्रकरणात जनतेपुढे वास्तव यावे, यासाठी राज्यभर पत्रकार परिषद घेत आहे. बॉम्बस्फोटोतील आरोपींकडून १५ ते २० लाखाला नवाब मलिक यांनी ही जागा विकत घेतल्याने ईडीने त्यांना अटक केली. यात भाजप व केंद्राचा संबंध कुठेही नाही. नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मलिक यांचा राजीनामा घेतला पाहिजे, पण सत्ता जाईल या भीतीने ठाकरे हतबल आहेत, अशी टीका दरेकर यांनी केली.
---------------------
राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन
राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीने टीकेची झोड उठवली आहे. त्यावर दरेकर म्हणाले, ‘‘राज्यपाल कोश्‍यारी जे बोलले याचा विपर्यास केला जात आहे. त्यांना शिवाजी महाराज यांच्याबद्दल आदर आहे, अनादर केलेला नाही.’’
-----------------------