
पुण्यामध्ये कोव्हॅक्सिनचा ३ दिवस पुरेल इतका साठा
पुणे, ता. १ : शहरात पुढील तीन दिवस पुरेल इतकाच कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लशीचा साठा शिल्लक आहे. राज्य सरकारकडून लशीचा पुरवठा झाल्यास पूर्ण क्षमतेने लसीकरण करता येईल. अन्यथा केंद्रांची संख्या कमी करावी लागतील, असे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.
शहरात गेल्या महिन्यामध्ये कोव्हॅक्सिनचा खडखडाट झाला होता. त्यामुळे कोव्हॅक्सिनच्या लसीकरण केंद्रे निर्मनुष्य झाली होती. या पार्श्वभूमिवर केंद्राने राज्याला आणि राज्याकडून महापालिकेला लशीचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर पुन्हा रांगा लागू लागल्या. मात्र, गेल्या पंधरा दिवसांमध्ये हा लशीचा साठा संपत आला आहे. शेवटचे दहा हजार डोस सध्या महापालिकेकडे शिल्लक आहेत. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये हा साठा संपेल. त्यानंतर लस द्यायची कशी, हा प्रश्न निर्माण होणार आहे.
महापालिकेच्या लसीकरण विभागाचे प्रमुख डॉ. सूर्यकांत देवकर म्हणाले, “किशोरवयीन वयोगटासाठी ४० केंद्रांवर लसीकरण करण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रांवर लशीचे शंभर डोस देण्यात आले आहेत. तसेच, अठरा वर्षांपेक्षा जास्त आणि कोव्हॅक्सिनच्या बूस्टर डोससाठी १६ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, कोव्हिशिल्ड लस १७९ ठिकाणी उपलब्ध आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी त्यांच्या जवळच्या केंद्रांवर जाऊन आपला लशीचा डोस घ्यावा.”
दृष्टीक्षेपातील लसीकरण
पुणे जिल्हा ..................................................... महाराष्ट्र
पहिला डोस ........ ९५ लाख ७ हजार २९१ ..... ८ कोटी ७३ लाख ५४ हजार १०३
दुसरा डोस ........ ७५ लाख ३८ हजार १०६ .... ६ कोटी ६९ लाख ३३ हजार ९८९
बूस्टर डोस ........... २ लाख ३२ हजार १७५ .... १५ लाख २७ हजार ६१८
.....