
पुण्यात उन्हाचा चटका वाढणार
पुणे, ता. १ ः पुणे शहर आणि परिसरात उन्हाचा चटका वाढला आहे. तर सायंकाळी काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरणामुळे उकाडाही जाणवू लागला आहे. दरम्यान पुढील तीन दिवस शहरात अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून किमान तापमानाचा पारा सुद्धा वाढेल. त्यामुळे पुणेकरांना उकाडा अधिक जाणवू शकतो, असा अंदाज हावामानशास्त्र विभागाने दिला आहे.
पुणे शहरात मंगळवारी ३४.९ अंश सेल्सिअस कमाल तर १३.६ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. शहरात गेल्या आठवड्यापासून कमाल तापमानाचा पारा ३४ अंशाच्यावर नोंदला जात आहे. दिवसा उन्हाचा चटका तापदायक ठरत असल्याने नागरिक उकाडा आणि उन्हापासून स्वतःचा बचाव करताना सनकोट आणि हँड ग्लव्हज वापरताना तसेच शीतपेय पिण्याला प्राधान्य देताना दिसत आहेत. हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार पुढील आठवडाभरात पुणे व परिसरातील कमाल तापमानात चढ-उतार तर, किमान तापमानात वाढ होऊ शकते.
राज्यातही उन्हाचा चटका कायम राहणार असून काही ठिकाणी ढगाळ वातावरणाची चिन्हे आहे. मंगळवारी राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान सोलापूर येथे ३७ अंश सेल्सिअस तर नीचांकी तापमानाची नोंद निफाड येथील गहू संशोधन केंद्रात १०.५ अंश सेल्सिअस इतकी झाली. तसेच विदर्भातील तुरळक भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली होती.
अग्नेय बंगालच्या उपसागर कमी दाबाचे क्षेत्राची निर्माण झाले असून ही प्रणाली अधिक ठळक होणार आहे. तसेच ही प्रणाली शुक्रवारपर्यंत (ता. ४) श्रीलंकेच्या किनाऱ्याकडे सरकण्याची शक्यता आहे. सध्या मराठवाडा आणि परिसरावर चक्राकार वारे सक्रिय असून ओडिशा आणि परिसरावरही चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. याचा परिणाम राज्यावर ही होणार असून काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. यामुळे उकाडा वाढेल.