रजेसाठी कारणं अन् ‘हाफ डे’चं दुखणं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रजेसाठी कारणं अन्
‘हाफ डे’चं दुखणं
रजेसाठी कारणं अन् ‘हाफ डे’चं दुखणं

रजेसाठी कारणं अन् ‘हाफ डे’चं दुखणं

sakal_logo
By

‘‘छे बुवा. या साहेब लोकांचं काही खरं नाही. पगार वाढवा, अशी मागणी केली तर ‘तू काय काम करतोस, तेव्हा तुला पगार वाढवायला हवा’, असं बिनदिक्कत सगळ्या स्टाफसमोर ऐकवतात आणि रजा मागायला गेलं तर ‘तुझ्या वाट्याचं काम कोण करणार’? असा प्रश्‍न विचारून बुचकाळ्यात पाडतात. अरे एक काही तरी ठरवा ना.’’ बॉसच्या केबिनमधून बाहेर पडताच समीरने सहकाऱ्यांसमोर आपली कैफियत मांडली.
‘‘लग्नाच्यावेळीही त्यांनी मला रजा नाकारली होती. अरे लग्न सकाळी अकराचं आहे ना. अर्ध्या तासात सगळे धार्मिक विधी उरकतात. त्यानंतर जेवणासाठी अर्धा तास पुरेसा झाला. त्यानंतर काय मंगल कार्यालयात बसूनच राहणार ना? त्यापेक्षा ‘हाफ डे’ कामावर ये.’’ असं म्हणून माझी बोलती बंद केली होती.’’ समीरने म्हटलं.
‘‘अरे मला तर हनिमूनसाठी कशाला हवीय आठवडाभराची सुटी? असं विचारलं होतं. एक दिवस खूप झाली. सकाळी महाबळेश्‍वरला जायचं आणि संध्याकाळी परत घरी यायचं, असा तोडगाही त्यांनीच सुचवला होता.’’ दिनेशने जुनी आठवण काढली.
आपल्या सहकाऱ्यांना सुट्या मंजूर करण्यात बॉसला अजिबात आवडत नव्हतं. सुट्या घेणं म्हणजे वेळ वाया घालवणं, असं त्यांचं मत होतं. उलट त्यांची रविवारची साप्ताहिक सुटीही बंद केली पाहिजे, अशी त्यांची इच्छा असायची. ‘माणसानं कसं सतत कामात गर्क असलं पाहिजे, तरच तो प्रगती करू शकतो,’ या वाक्यावर त्यांचा फार विश्‍वास होता.
थोड्यावेळापूर्वी समीर त्यांच्या केबिनमध्ये जाऊन रजेसाठी विनवणी करून आला होता.
‘‘सर, माझ्या आजोबांची तब्येत बरी नाही. त्यामुळे मला आठवडाभराची सुटी हवीय.’’ समीरने म्हटले.
‘‘व्हॉट नॉनसेन्स. अरे गेल्या वर्षी आजोबा गेले म्हणून पाच दिवसांची तू सुटी घेतली होतीस, हे विसरलास का?’’ बॉसने रागाने विचारले. त्यावर समीर विचारात पडला. मागील रजेसाठी आपण आजोबा गेले असं कारण सांगितलं होतं का? हे त्याला आठवेना.
‘‘सर, आईच्या वडिलांनाही आजोबाच म्हणतात. आता तेच आजारी आहेत.’’ प्रसंगावधान राखत समीरने उत्तर दिले.
‘‘काय होतंय आजोबांना?’’ बॉसने विचारले.
‘‘सर, त्यांच्या कवळीला डायरिया झालाय.’’ समीरने खाली मान घालून म्हटले.
‘‘कवळीला डायरिया? अरे पायोरिया म्हणायचं का? आणि तो हिरड्यांना होतो कवळीला नाही.’’ बॉसने असं म्हटल्यावर समीर सावध झाला.
‘‘सर पायोरियाच झालाय. त्यांचे दोन्ही पाय सुजलेत.’’ समीरने असं म्हटल्यावर बॉस एकदम चिडले.
‘‘अरे बाबा! पायोरियाचा पायाशी काही संबंध नाही. तू आधी बाहेर हो. पटेल अशी कारणं तरी देत जा.’’ असं म्हणून बॉसने त्याला बाहेर काढले.
केविलवाण्या नजरेने बाहेर येत त्याने सगळी कैफियत मित्रांसमोर मांडली. असेच दहा-बारा दिवस कामात गेले.
काही दिवसांनी समीरने बॉसला फोन केला.
‘‘सर, माझ्या दुचाकीला खरोखर अपघात झालाय. मला दवाखान्यात ॲडमिट केलंय. माझ्या पायाला फ्रॅक्चर झालंय. आता मी काय करू?’’ काकुळतीला येत त्याने म्हटले. त्याआधीच त्याने व्हॉटसॲपवर डोक्याला व पायाला बॅंडेज गुंडाळल्याचे फोटोही पाठवून दिले. सोबत दवाखान्याचे ॲडमिट कार्डचाही फोटो पाठवला.
‘‘अरे एक तर आधीच ऑफिसमध्ये माणसं नाहीत. बरीच कामं खोळंबली असताना नेमका त्याचवेळी तुला अपघात कसा काय होतो. हा अपघात तुला पुढे ढकलता आला नसता का? आता असं कर शक्यतो ‘हाफ डे’ तरी ये.’’ बॉसचं बोलणं ऐकून समीरची दातखिळी बसली.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top