
मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख नको - शरद पवार
पुणे - मुख्यमंत्रीm (Chief Minister) एक व्यक्ती नव्हे तर संस्था (Organization) असते. तिचा यथोचित सन्मान राखला पाहिजे. त्यांचा कोणीही एकेरी उल्लेख करू नये, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकाच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ‘भोंगा’ प्रकरणात राज्यात चाललेला हायव्होल्टेज ड्रामा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संबंधी होणाऱ्या वक्तव्याबद्दल त्यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले, ‘काही धार्मिक कार्यक्रम हे स्वतःच्या घरातच करायचे असतात. दुसऱ्याच्या घरासमोर जाऊन करायचा आग्रह धरू नये.’ महाराष्ट्रातील राजकीय संस्कृतीचा दर्जा घसरल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
फडणवीसांना चिमटा
सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ होतात. सगळेच माझ्यासारखे नसतात. निवडणुकांपूर्वीच काही लोकांनी ‘मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार’, अशा घोषणा दिल्या होत्या. त्यामुळेच ते सध्या अस्वस्थ होत असतील, तर मी त्यांना दोष देणार नाही, अशा शब्दांत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला.
रात्रीतून वर्षा बंगला सोडला
माझी सत्ता कैकदा गेली आहे. १९८० मध्ये माझे सरकार बरखास्त झाले. रात्री साडेबारा वाजता मुख्य सचिवांनी मला ही बातमी दिली. त्यानंतर मी तीन-चार लोकांना बोलावून घरातील सामान आवरले. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलो. सरकारची गादी सोडली. त्यादिवशी मुंबईत इंग्लंड आणि भारत यांची क्रिकेट मॅच होती. ती मॅच पाहण्यासाठी मी सकाळी १० वाजता वानखेडे स्टेडिअमवर गेलो आणि दिवसभर मॅच पाहण्याचा आनंद लुटला. सत्ता येते आणि जाते. त्यामुळे आपण इतके अस्वस्थ होण्याची गरज नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..