
पूर्ववैमनस्यातून दोन गटात मारामारी
पुणे, ता. २५ ः पूर्वी झालेल्या भांडणाच्या वादातून दोन गटांमध्ये मारामारी झाल्याची घटना घडली. ही घटना नवी पेठेतील राजेंद्रनगर परिसरात शनिवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दाखल करण्यात आली असून, १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिजित संजय गव्हाणे (वय २५, राजेंद्रनगर, नवी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन विकी रणदिवे, शुभम सकट, सचिन मोहिते, ओंकार ननावरे, रामा लोखंडे, शंकर पाटील, आशुतोष जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करून, त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिजित गव्हाणे हे त्यांचे मित्र मुजाहिद शेख याच्यासह त्यांच्या दुचाकीवरून शनिवारी रात्री फिरत होते. ते रात्री साडे नऊच्या सुमारास राजेंद्रनगरमधील महापालिका वाचनालयाजवळ आले. त्यावेळी पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून टोळक्याने फिर्यादी व त्यांचा मित्र शेख यांना हाताने मारहाण करून त्यांच्यावर दगडफेक केली. यावेळी भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या एका महिलेच्या उजव्या हातावर सिमेंटची वीट लागल्याने संबंधित महिला तसेच फिर्यादी जखमी झाले. तसेच फिर्यादीच्या दुचाकीचीही तोडफोड करण्यात आली.
दरम्यान, या प्रकरणामध्ये सचिन निवृत्ती मोहिते (वय ३०) याने परस्पर विरोधी फिर्याद दिली. त्यावरुन मुजाहिद नजीम शेख, अभिजित गव्हाणे, अजित तुपेरे, सुफियान शेख, राहुल शिंदे, अनिल तुपेरे, राहुल खाडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी मोहिते हे त्यांचे मित्र आशुतोष जगताप यांच्याशी राजेंद्रनगर येथील एका इमारतीसमोर गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी संशयित आरोपी दुचाकीवरून तेथे आले. त्यांनी फिर्यादी मोहितेला धमकावले तसेच मोहिते आणि त्याच्या मित्राला हाताने मारहाण करून त्यांच्यावर दगडफेक केली. या दगडफेकीत ते जखमी झाले. या प्रकरणाचा तपास फौजदार मुकेश कुरेवाड करीत आहेत.
--------