
पुणे, ता. २५ : अभिनेत्री कंगना राणावत व नवनीत राणा यांना पुढे करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्याचे भाजप नेत्यांचे चालू असलेले पोरकट, उथळ व बायकी राजकारण निंदनीय असल्याचे सांगत काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी त्याचा निषेध केला. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेमुळे ‘हनुमान चालिसा’चे मुख्य प्रवर्तक भाजप असल्याचेच सिद्ध झाले. भोंगे व हनुमान चालिसाचेच राजकारण करायचे होते तर भाजपने स्वतः पुढे येऊन सुरवातीसच का केले नाही? महिलांना पुढे करून हनुमान चालिसा रस्त्यावर म्हणायला लावण्याचा इव्हेंट हा ताटे व थाळ्या वाजवण्यासारखा आहे. हा प्रकार असंख्य हनुमान भक्तांना वेदनादायक असल्याचे तिवारी यांनी या वेळी सांगितले.