अठ्ठावीस वर्षे रसिकांना खळखळून हसवणारा अवलिया! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अठ्ठावीस वर्षे रसिकांना खळखळून हसवणारा अवलिया!
अठ्ठावीस वर्षे रसिकांना खळखळून हसवणारा अवलिया!

अठ्ठावीस वर्षे रसिकांना खळखळून हसवणारा अवलिया!

sakal_logo
By

राम नगरकर कला अकादमीच्या वतीने प्रसिद्ध विनोदी अभिनेते समीर चौघुले यांना यंदाचा ‘राम नगरकर कलागौरव पुरस्कार २०२१’ देण्यात येणार आहे, यानिमित्ताने त्यांच्या कारकिर्दीविषयी थोडेसे...

वंदन राम नगरकर
अध्यक्ष, राम नगरकर कला अकादमी, पुणे

‘‘निसर्ग किती ग्रेट आहे ना! शब्द संपले की भावनांना वाट मिळावी म्हणून त्याने अश्रूंची निर्मिती केली...आज ते प्रकर्षानं जाणवलं...आज सुरांची आणि स्वरांची सरस्वती आदरणीय लता मंगेशकर दीदींनी अत्यंत प्रेमाने घरी एक भेटवस्तू आणि माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी ट्रॉफी पाठवली. आणि ती ट्रॉफी म्हणजे दीदींच्या हस्ताक्षरातील शुभेच्छा आणि आशीर्वाद....थिजून जाणं म्हणजे काय ते आज मला कळलं,’’ अशा भावना व्यक्त केल्या आहेत प्रसिद्ध विनोदी अभिनेते समीर चौघुले यांनी. सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम लतादीदी कायम पाहतात. त्यातील चौघुले यांचा अभिनय लतादीदींना खूप आवडतो, त्या समीरजींना म्हणाल्या ‘‘आपल्यावर भगवंताची कृपा आहे. आम्हाला असंच हसवत रहा.’’

चौघुले मूळचे मुंबईतील दहिसरचे. शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी या शाळेचे विद्यार्थी. नंतर त्यांचे पुढील शिक्षण डहाणूकर कॉलेज येथे झाले. तिथेच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. याच कॉलेजमुळे चौघुले यांना रंगभूमीबद्दल आकर्षण निर्माण झालं. ‘यदाकदाचित’ या नाटकाचे त्यांनी तीन हजारपेक्षा जास्त प्रयोग केले. ‘‘हेच नाटक माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट होता,’’ असं समीर म्हणतात. ‘ह्याचं करायचं काय!’, ‘श्री बाई समर्थ’, ‘बीपी’, ‘वाऱ्यावरची वरात’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘सेलिब्रिटी वस्त्रहरण’, ‘जाऊ बाई जोरात’, ‘ज्याचा शेवट गोड’, ‘गोष्ट तुझी माझी’, ‘लगे हो राजाभाई’, ‘असा मी, अशी मी’ अशा व्यावसायिक नाटकांचे त्यांनी एकूण पाच हजारपेक्षा जास्त प्रयोग केले.

इंग्रजी रंगभूमीवरील सुप्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक भरत दाभोळकर यांच्याबरोबर ‘मंकी बिझनेस’, ‘तमाशा मुंबई’, ‘स्टाईल’, ‘कॅरी ऑन हेव्हन’, ‘बेस्ट ऑफ बोटम्स अप’ अशा अनेक नाटकांमधून त्यांनी काम केले आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘आंबटगोड’, ‘सुपरफास्ट कॉमेडी एक्स्प्रेस’, ‘फू बाई फू’, ‘होणार सून मी त्या घरची’, ‘रुंजी’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘टिकल ते पोलिटिकल’, ‘दिल्या घरी तू सुखी रहा’, ‘एक मोहोर अबोल’ या आणि अशा अनेक मालिका त्यांनी आपल्या अभिनय सामर्थ्याच्या जोरावर गाजविल्या आहेत. त्याचप्रमाणे ‘एफआयआर’, ‘आज के श्रीमान श्रीमती’, ‘येस बॉस’, ‘चुपकेचुपके’, ‘ये चंदा कानून है’, ‘मणिबेन डॉट कॉम’ या हिंदी मालिकांमध्येही त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक झाले आहे.

त्यांना आजवर २०१५ मध्ये बीपी या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्यासाठी झी गौरव पुरस्कार, २०१३ मध्ये मिळाला आहे. २०१३ मध्ये ‘आंबटगोड’ या मालिकेतील कामासाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता हा संस्कृती कलादर्पणचा पुरस्कार मिळाला. २०१६ मध्ये श्री बाई समर्थ या नाटकासाठी संस्कृती कलादर्पणचा सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता हा पुरस्कार मिळाला. त्याचप्रमाणे राज्य शासन व्यावसायिक नाटक स्पर्धा २०१६ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

लेखन, दिग्दर्शन व अभिनय या सर्व बाजू समर्थपणे सांभाळत गेली अठ्ठावीस वर्षे सिनेनाट्य क्षेत्रावर त्यांनी
अधिराज्य गाजविले आहे. म्हणूनच राम नगरकर कला गौरव पुरस्कारासाठी वंदन राम नगरकर, मंदा हेगडे, संध्या वाघमारे आणि उदय नगरकर यांनी राम नगरकर कला अकादमीच्या वतीने चौघुले यांची निवड केली आहे. राम नगरकर यांनी आपल्या कारकिर्दीत रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात, एक हरहुन्नरी कलाकार म्हणून एक खास मानाचे स्थान मिळविले होते. त्यांची ही विनोदाची परंपरा, कलाक्षेत्रात पुढे नेण्याऱ्या विनोदी कलाकाराला ‘राम नगरकर कलागौरव पुरस्कार’ दिला जातो. यापूर्वी हा पुरस्कार विनोदी अभिनेते भाऊ कदम आणि डॉ. नीलेश साबळे यांना देण्यात आला होता.

ज्येष्ठ समाजसेविका रेणू गावस्कर यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी उपस्थित राहणार आहेत. चौघुलेंचे गुरू विश्वास सोहनी, हास्यजत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी तसेच बेलवलकर हौसिंगचे संचालक समीर बेलवलकर हेदेखील उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम गुरुवारी (ता. ६) सायंकाळी ५ वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. रोख रुपये ११०००, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यानिमित्त प्रसिद्ध विनोदी कलाकार महेंद्र गणपुले, दिलीप हल्याळ, रत्ना दहिवेलकर आणि बंडा जोशी ‘हास्यजल्लोष’ हा विनोदी कार्यक्रम सादर करणार आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top