
तेरा दिवसांत दहा जणांची माघार
पुणे, ता. ७ ः पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) पंचवार्षिक निवडणुकीसाठी वैध ठरलेल्या ९१ उमेदवारी अर्जांपैकी गेल्या तेरा दिवसांत दहा जणांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. उद्या (मंगळवार) अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार की प्रत्यक्ष मतदान होणार आहे, हे उद्या (मंगळवारी) स्पष्ट होणार आहे.
या निवडणुकीसाठी येत्या २० मार्चला मतदान होणार आहे. मतदानानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे २१ मार्चला मतमोजणी केली जाणार असून, मतमोजणीनंतर लगेचच निकाल जाहीर केले जाणार असल्याचे कात्रज डेअरीचे निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद सोबले यांनी सांगितले. जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाच्या १६ जागा आहेत. यापैकी आजअखेरपर्यंत (ता.७) तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. बिनविरोध झालेल्यांमध्ये गोपाळ म्हस्के (हवेली), मारुती जगताप (पुरंदर) आणि भगवान पासलकर (वेल्हे) या तीन जणांचा समावेश आहे. या तीनपैकी म्हस्के आणि पासलकर हे विद्यमान संचालक असून जगताप हे नवीन आहेत. उर्वरित तेरा जागांसाठी सध्या ८१ जण निवडणूक रिंगणात आहेत. मात्र उद्या अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत अनेक जण या निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतील, अशी अपेक्षा जाणकारांनी व्यक्त केली आहे.
मागील तेरा दिवसांत माघार घेणाऱ्यांमध्ये शैलेश म्हस्के (हवेली), शोभा पासलकर, माणिक पासलकर (दोघेही वेल्हे), जनाबाई खिलारी (महिला राखीव), महादेव वाडेकर, प्रकाश बांगर (दोघेही खेड), नितीन थोपटे (भोर), बाळासाहेब साकोरे (शिरूर), भाऊसाहेब नेटके (अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघ) आणि संभाजी भुजबळ (नागरिकांचा मागास प्रवर्ग मतदारसंघ).
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..