दस्तनोंदणीसाठी असुविधा, अनागोंदी कारभारामुळे नागरिक त्रस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Stamp Registration
दस्तनोंदणीसाठी असुविधा, अनागोंदी कारभारामुळे नागरिक त्रस्त

दस्तनोंदणीसाठी असुविधा, अनागोंदी कारभारामुळे नागरिक त्रस्त

पुणे - आज आमच्या प्लॉटची (Plot) सकाळी दहा वाजता दस्तनोंदणी (Stamp Registration) होती... वकिलाने (Lawyer) साडेआठ वाजताच बोलविले होते... आम्हाला एक तास उशीर झाला... कार्यालयात (Office) प्रचंड गर्दी झाल्याने पुढे नंबर येण्यासाठी तीन वाजले... भुकेने जीव व्याकूळ झाला होता... कार्यालयात पाणी नाही, बसण्यासाठी धड जागा नाही... बाथरूमची व्यवस्था नाही... बाहेर ऊन... अशा त्रासामुळे सदनिका घेतल्याच्या आनंदापेक्षा त्रासच अधिक झाला... ही आहे, शिल्पा चव्हाण (नाव बदलले आहे) यांची प्रतिनिधिक प्रतिक्रिया.

अशाच काहीसा अनुभव दस्तनोंदणीसाठी गेलेल्या पुणेकरांना येत आहे. अनेकदा सर्व्हअर डाउन होतो, अथवा स्लो झाला, की तुमचा नंबर येण्यासाठी किती वेळ लागले हे सांगता येत नाही. दस्तनोंदणी शुल्कापोटी लाखो रुपये महसूल सरकारला आम्ही मिळून देतो, परंतु साधी पिण्याच्या पाण्याची आणि बाथरूमची व्यवस्था करता येत नाही, यापेक्षा दुर्दैव काय म्हणावे, असे एका वकिलाने सांगितले.

रोज ६० ते ७० दस्तनोंदणी

पुणे शहरात २८ दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. एका कार्यालयात किमान साठ ते सत्तर दस्तांची दररोज नोंदणी होती. वकील, खरेदीदार आणि विक्री करणारे असे एका दस्तनोंदणीच्या वेळी किमान चार ते पाच जण कार्यालयात येतात. किमान दिवसभरात आठशे ते हजाराहून अधिक नागरिक येत असतात. प्राथमिक सुविधादेखील या कार्यालयांमध्ये नसल्यामुळे त्याचा प्रचंड मानसिक त्रास नागरिकांना सहन करावा लागतो.

५ - शासकीय जागेत असलेल्या कार्यालयांची संख्या

६ - निमशासकीय जागेत असलेल्या कार्यालयांची संख्या

१७ - खासगी जागेत असलेल्या कार्यालयांची संख्या

नागरिक, वकिलांच्या तक्रारी

  • एकीकडे सुविधा नाही, तर दुसरीकडे पुरेसा कर्मचारी वर्ग

  • अनेकदा शिक्के मारणे, स्कॅनिंगसाठी मदत करणे अशी अनेक कामे नागरिकांनाच करावी लागतात

  • दस्तनोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांचा वेळ जातो वाया

  • दिवसभर नागरिकांना थांबावे लागते

  • कोणतीही चांगली ‘सिस्टीम’ नाही

  • अनेकदा साहेब उशिरा येतात

  • दुसरा पर्याय नसल्यामुळे त्रास सहन करावा लगतो

महसूल मिळतो, सुविधा नाही

गेल्या काही वर्षांत महापालिकेच्या हद्दीचा विस्तार झाला. दस्तनोंदणीची संख्या वाढली आहे. राज्याला मिळणाऱ्या एकूण महसुलापैकी जवळपास वीस टक्के महसूल एकट्या पुणे शहरातून मिळतो. असे असतानादेखील पुरेशा सुविधा देणे राज्य सरकारला शक्य का होत नाही, असा संतप्त सवाल दस्तनोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांकडून केला जात आहे.

आपलेही अनुभव सांगा

दस्तनोंदणीसाठी गेल्यानंतर आपल्यालाही अनेक अनुभव आले असतील. याबाबत आपल्या प्रतिक्रिया नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर कळवा.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top