
अस्पष्ट ‘नो पार्किंग’मुळे प्रवाशांना भुर्दंड वाकडेवाडीतील स्थिती; आगार व्यवस्थापनाचा विरोध असतानाही दंडवसुली
पुणे, ता. १२ : वाकडेवाडी (शिवाजीनगर) येथे एसटी आगाराने मनाई केलेली असतानाही स्थानकाच्या आवारात ‘नो पार्किंग’च्या नावाखाली वाहने उचलण्याचा प्रकार वाहतूक पोलिसांकडून सुरू आहे. त्यामुळे शेकडो वाहनचालकांना दररोज दंड भरावा लागत आहे. एसटी आगार व्यवस्थापनाने या प्रकाराला विरोध केला असला तरी, वाहतूक पोलिसांकडून ‘वसुली’ सुरूच आहे.
वाकडेवाडी आगारात प्रवेश करतानाच उजव्या बाजूला एसटी कर्मचाऱ्यांसाठीच्या खोल्या आहेत. तेथे मोकळी जागा आहे. त्यामुळे या जागेवर दुचाकींचे पार्किंग केले जाते. याचा फायदा घेत तेथील भिंतीवर वाहतूक पोलिसांनी स्केचपेनने लाल अक्षरात ‘नो पार्किंग’ असे लिहिले आहे. त्याचा नेमका फलकही तेथे लावलेला नाही. पेनने लिहिलेले वाहनचालकांच्या लक्षात येत नाही. पोलिसांच्या वाहनांसह अन्य वाहनेही तेथे उभी करण्यात येत असल्यामुळे नागरिकही त्यांच्या दुचाकी तेथे उभ्या करतात. त्यानंतर काही वेळातच वाहतूक पोलिसांकडून ती वाहने उचलली जातात. तेव्हा संबंधित दुचाकीचालक आला तर त्याच्याकडून जागेवरच दंड वसूल केला जातो. नाही तर ती गाडी ताब्यात घेतली जाते. या ठिकाणी पोलिस असे लिहिलेल्या दुचाकी मात्र उचलल्या जात नाहीत, अशी तक्रार नागरिकांनी केली. स्थानकाच्या आवारातून नागरिकांच्या दुचाकी उचलू नये, असे वाहतूक पोलिसांना लेखी पत्राद्वारे कळविले आहे, तरीही पोलिसांकडून मनमानी सुरू असल्याचे वाकडेवाडी आगाराचे व्यवस्थापक अनिल भिसे यांनी सांगितले.
आगारात दुचाकी पार्क करताच वाहतूक विभागाकडून वाहने ती ताब्यात घेतली. त्यानंतर सहजासहजी डोळ्यांना न दिसणारे ‘नो पार्किंग’ असे पेनने लिहिलेले वाक्य त्याने दाखवले. ही नागरिकांची फसवणूक आहे.
- अक्षय निंबाळकर, दुचाकीचालक
कोणत्याही आगारातून वाहतूक पोलिसांनी प्रवाशांच्या नातेवाइकांच्या गाड्या उचलू नयेत, असे पत्र वाहतूक विभागाला दिले आहे. तरीसुद्धा कारवाई केली जात आहे. एसटी आगारात पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित नाही, अशी कारवाई करू नये यासाठी पुन्हा पत्र वाहतूक पोलिस विभागाला पाठवले जाईल.
- ज्ञानेश्वर रणवरे, विभागीय वाहतूक नियंत्रक, एसटी, पुणे
एसटीने कोणतेही पत्र दिलेले नाही. मग कोंडी होत असेल तर पोलिसांऐवजी एसटी महामंडळानेच नियमन करावे. पोलिसांच्या दुचाकी वाहनांवरही कारवाई करू. नो पार्किंगचा फलक लावला नसेल, तरी कारवाई करावी लागतेच.
- आर. डी. शेळके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, खडकी वाहतूक विभाग
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..