
‘शहरातील अनधिकृत फ्लेक्सबाबत विभागीय कार्यालयास जबाबदार धरा’
पुणे, ता. २४ ः अनधिकृत फ्लेक्समुळे शहर बकाल होत असल्याने हे फ्लेक्स काढण्याची मोहीम कायम सुरू ठेवावी, तसेच याप्रकरणी विभागीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पुणे शहर माजी महापौर संघटनेने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.
प्रशासक म्हणून आयुक्त कुमार यांची नियुक्ती झाल्याने माजी महापौरांच्या शिष्टमंडळाने आज आयुक्तांची भेट घेतली. या वेळी बाळासाहेब शिवरकर, राजलक्ष्मी भोसले, कमल व्यवहारे, उल्हास ढोले-पाटील, अंकुश काकडे, शांतिलाल सुरतवाला, दत्तात्रेय गायकवाड, वैशाली बनकर, प्रशांत जगताप उपस्थित होते.
‘सकाळ’ने अधिकृत फ्लेक्सचा प्रश्न मांडला, त्यास पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद देत ‘चमकोगिरीसाठी शहराचे विद्रूपीकरण थांबवा’ अशी मागणी केली आहे, तसेच राजकीय पदाधिकारी, त्यांच्या कार्यकर्त्यांवर टीका केली आहे. माजी महापौरांच्या संघटनेनेही अनधिकृत फ्लेक्सचा मुद्दा उपस्थित करून विभागीय कार्यालयास यासाठी जबाबदार धरा, अशी मागणी केली आहे. त्याचप्रमाणे फ्रंट मार्जिनमधील कारवाई सुरू ठेवावी, यासाठी कोणाचाही दबाव आला तरी कारवाई थांबवू नये. शहरातील प्रलंबित रस्त्यांची रुंदीकरण त्वरित करावेत, गरज पडल्यास पोलिसांची मदत घ्यावी. १ जानेवारी २१ ते १४ मार्च २०२२ या कालावधीत अभिप्राय न घेता महापालिकेच्या जागा वाटप केल्या आहेत, ते ठराव रद्द करावेत या मागण्याही संघटनेने आहेत.
--------
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..