
तालेरा शाळेस ‘सीबीएसई’ची मान्यता
पुणे, ता. ७ : कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या मोतीलाल तालेरा इंग्रजी माध्यम प्राथमिक व माध्यमिक शाळेस (मोशी) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (सीबीएसई) मान्यता मिळाली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रात २०१५मध्ये ही शाळा स्थापन झाली आहे. सोसायटीचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती, शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा शादबर यांनी सीबीएसई मान्यतेची माहिती दिली.
हुजूरपागा शाळेत विद्यार्थिनींशी संवाद
पुणे : लक्ष्मी रस्ता येथील एच. एच. सी. पी. हायस्कूल हुजूरपागा प्रशालेत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह वि. दा. पिंगळे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यांनी ‘वाचनातून समृद्धीकडे’ या विषयावर विद्यार्थिंनींशी संवाद साधला. वाचनाचे महत्त्व स्पष्ट करत मनाची निरागसता टिकवून ठेवण्यासाठी वाचन आवश्यक असल्याचेही पिंगळे यांनी सांगितले. दररोज ग्रंथालयास भेट द्या, मैत्रिणीच्या वाढदिवसाला पुस्तके भेट द्या, अशा सल्लाही त्यांनी विद्यार्थिनींना दिला. शाळेच्या मुख्याध्यापिका रंजना वाठोरे, पर्यवेक्षिका हेमलता भूमकर, सुधा कांबळे यांनी मार्गदर्शन केले. शिक्षिका नीलम गडदे यांनी सूत्रसंचालन केले.
मराठी भाषेबाबत ऑनलाइन मार्गदर्शन
पुणे : डी. ई. एस. सेकंडरी शाळेच्या मराठी विभागातर्फे आयोजित सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात कवी किशोर बळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘मराठी ही एक जीवनशैली असून वऱ्हाडी, नागपुरी, पुणेरी, अहिराणी, आगरी, कोकणी, मालवणी अशा बोली भाषांनी मराठी समृद्ध केली आहे. बोली भाषांचा गोडवा वेगळाच आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायलाच हवा.’’ याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती बोधे, पर्यवेक्षिका सरिता स्वादी आदी शिक्षक उपस्थित होते. बोधे यांनी प्रास्ताविक केले. राघवेंद्र गणेशपुरे यांनी सूत्रसंचालन केले. कांचन सोलापूरकर यांनी आभार मानले.
रमणबाग प्रशालेत बहुआयामी तासिका
पुणे : न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेमध्ये ‘आहार आणि जीवनशैली’ विषयावर शाळेचे माजी विद्यार्थी व डॉ. सुधांशू ताकवले यांचे व्याख्यान झाले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. ताकवले यांनी ‘आहार, आरोग्य, निद्रा, खेळ आणि वाचन या पंचसूत्रीचा अवलंब केल्यास आपण आरोग्य संपन्न होऊ शकतो’, असा संदेश दिला. यावेळी पर्यवेक्षक दिलीप रावडे, सुरेश वरगंटीवार, दीप्ती डोळे आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक सुनील शिवले यांनी प्रास्ताविक केले. शिक्षिका अर्चना देवळणकर यांनी सूत्रसंचालन केले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..