‘बीजे’च्या स्वायत्ततेचा प्रस्ताव लालफितीत
पुणे, ता. २० : बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वायत्ततेचा प्रस्ताव गेल्या चार वर्षांपासून लालफितीच्या कारभारात अडकला आहे. यासंदर्भात वारंवार चर्चेच्या फेऱ्या झाल्या. मात्र, त्यातून निर्णय झाला नसल्याची माहिती आता पुढे येत आहे.
ससून रुग्णालय हे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालय आहे. कोरोना उद्रेकात केवळ पुण्यासाठीच नाही; तर राज्यातील उपचाराचे मुख्य केंद्र म्हणून ससून रुग्णालयाने भूमिका बजावली होती. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधून रुग्ण उपचारांसाठी ससून रुग्णालयाकडे धाव घेत होते.
स्वायत्तता का महत्त्वाची?
अतिविशेष उपचार, प्रगत वैद्यकीय शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय संशोधनाच्या व्यवस्थापनासाठी ही स्वायत्तता महत्त्वाची असल्याचे राज्य सरकारला दिलेल्या प्रस्तावात नमूद केले आहे. ससून रुग्णालयात अद्ययावत नवजात अर्भक विभाग, वैद्यकीय अतिदक्षता विभाग, डायलिसिस केंद्र, ट्रॉमा सेंटर कार्यान्वित केले आहे. उद्योगांची सामाजिक जबाबदारी (सीएसआर) आणि सरकारी निधी या माध्यमातून ससून रुग्णालयाचा कायापालट केला आहे. त्याचवेळी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन प्रकल्प सुरू आहेत. दरवर्षी दहा कोटी रुपयांपर्यंत आंतरराष्ट्रीय संशोधन निधी महाविद्यालयाला मिळत आहे. एवढा भरीव निधी मिळणाऱ्या देशभरातील महाविद्यालयांमध्ये बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय अग्रक्रमावर आहे. त्यामुळे या संशोधनाला चालना मिळण्यासाठी महाविद्यालयाची स्वायत्तता आवश्यक आहे. मात्र, त्याबाबत चार वर्षांमध्ये अद्यापही कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती पुढे आली.
अतिविशेष सेवा विकसित करण्याची गरज
पुण्याबरोबरच पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा मिळून ७५ लाखांवर लोकसंख्या आहे. शहराच्या परिसरात औद्योगीकरणाचा वेग वाढत आहे. माहिती तंत्रज्ञानामुळे कुशल मनुष्यबळ निर्माण होत आहे. त्याच बरोबर मोठ्या संख्येने तरुण वर्ग पुण्यात येत आहे. बांधकाम व्यवसायासह इतर उद्योग विकसित होत असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकही पुणे आणि परिसरात येत आहेत. त्याचवेळी या लोकसंख्येसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा त्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. अशा पार्श्वभूमीवर स्वायत्तता मिळाल्याने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात अतिविशेष रुग्णसेवा विकसित करता येईल, असा विश्वास येथील डॉक्टर व्यक्त करतात.
स्वायत्ततेचे प्रयोग
कर्नाटक व गुजरातमध्ये महाविद्यालयांच्या स्वायत्ततेचा प्रयोग यशस्वी झाला आहे. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात सध्या तीन अतिविशेष उपचार सेवा उपलब्ध आहे. त्याचा विस्तार व्हावा, फेलोशिप अभ्यासक्रमाच्या माध्यमातून ज्ञानवृद्धी व संशोधनाद्वारे ज्ञान निर्मिती करण्यासाठी स्वायत्तता आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.