अखरे १८ दिवसांनी उजळले घर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अखरे १८ दिवसांनी उजळले घर
फ्लेक्सबाजीच्या विकृतीला द्या धक्का!

अखरे १८ दिवसांनी उजळले घर

sakal_logo
By

झटपट श्रीमंत होण्यासाठी अनेकदा चुकीच्या मार्गाचा अवलंब केला जातो, त्याच पद्धतीने राजकीय नेता किंवा भावी लोकप्रतिनिधी होण्यासाठी अनधिकृत फ्लेक्स, बॅनर लावण्याची विकृती झपाट्याने सर्वत्र वाढत आहे. अशा फ्लेक्सबाजीतून संबंधित व्यक्तीची लायकी तर कळतेच; पण त्या शहराची संस्कृती कोणत्या दिशेला चाललीय, याचे प्रतिबिंबही दिसते.

‘फक्त नेत्याच्या मागेपुढे करणारा किंवा केवळ फ्लेक्सवर झळकणारा कार्यकर्ता हा कोणत्याही नेत्याला, जनतेला कधीच आवडत नाही,’’ असे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख नेहमी सांगायचे. सरपंचपदापासून मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री अशी प्रदीर्घ राजकीय कारकीर्द असणारे विलासराव यांचे हे बोल किती योग्य आणि समर्पक होते, याची प्रचिती आज पुण्यातील फ्लेक्सबाजीतून लक्षात येते. कोणाचीही भीडभाड न ठेवता, नियमांचे उल्लंघन करीत उठसूट कोणीही हवा तेथे फ्लेक्स, बॅनर लावतो. स्वतःच्या वडिलांची जहागिरी असल्याप्रमाणे रस्त्यावरील प्रत्येक खांबावर हे दादा, भाऊ, साहेब वेगवेगळ्या पोझमध्ये झळकत राहतात. त्यांच्यावर कसलीही कारवाई होत नाही. कारवाई झालीच तर तिचा धाक तासभरही टिकत नाही. त्याच ठिकाणी पुन्हा नव्या दमाने पुन्हा बॅनर झळकतात. याचाच अर्थ कायद्याचा धाक कोणाला राहिला नाही.

सार्वजनिक मालमत्ता म्हणजे आमच्या बापजाद्यांची इस्टेट समजून सर्वच राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, त्या-त्या भागातील गुंड, सामाजिक संस्था-संघटनांचे पदाधिकारी अशा मालमत्तांवर फ्लेक्स, बॅनर, कार्यालय, विरंगुळा, वाचनालय या नावाखाली कब्जा करतात. यात सर्वजण सामील असल्याने ही कृती चुकीची आहे, याचे भानही कोणाला राहत नाही, अगदी अशीच परिस्थिती पुण्यात, पिंपरी-चिंचवडमध्ये पाहायला मिळते. ‘सकाळ’च्या माध्यमातून गेली आठ-दहा दिवसांपासून फ्लेक्सबाजी विरोधात नागरिकांचा आवाज उठवला आहे. प्रामाणिक करदात्यांना या फ्लेक्सबाजीचा उबग आला आहे. अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्‍यांवर कारवाई करावी, अशी त्यांची आग्रही मागणी आहे. महापालिका प्रशासकांनी अशा होर्डिंग फ्लेक्सवर काही प्रमाणात कारवाई केली आहे. १८ हजार फ्लेक्स-बॅनर काढून टाकण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, अशी किरकोळ कारवाई करून या विकृतीला आळा घालता येणार नाही, त्यासाठी ठोस धोरणच बनवावे लागेल.

फ्लेक्स लावला, त्यावर दोन-चार समर्थकांचे फोटो छापले की आपण नेता, पुढारी झालो असा अनेकांचा समज झाला आहे. स्वतःचा फोटो असलेला बॅनर छापून तो बेकायदेशीरपणे लावण्यासाठी काहीही अक्कल लागत नाही, मात्र राजकीय क्षेत्रात कारकीर्द घडवण्यासाठी काम करावे लागते हा संदेश जाणे महत्त्वाचे आहे. सध्या जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी गेली अनेक वर्ष जनतेमध्ये काम केले आहे, स्वतःची एक प्रतिमा बनवली आहे. आजही असे काही नगरसेवक, आमदार आहेत जे स्वतःचे बॅनर, फ्लेक्स लावत नाहीत, तरीही ते सातत्याने निवडून येतात. पण, सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांनाच बेकायदा फ्लेक्सवर झळकण्याची चटक लागली आहे. त्यामुळे नव्याने राजकारणात येणारे किंवा स्वतःचा प्रभाव निर्माण करू पाहणारे काम करण्याआधी फ्लेक्सवर झळकण्यास प्राधान्य देतो.

स्वच्छतेत सातत्याने आघाडीवर असणाऱ्या इंदूर शहरात कोठेही अनधिकृत फ्लेक्स दिसत नाहीत. जर इंदूरमध्ये हे शक्य असेल, तर पुण्यात का होत नाही? पुण्यात या संस्कृतीला खतपाणी घालण्याचे काम स्वतः नेते मंडळीच करताना दिसतात. महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथीला भले मोठे फ्लेक्स लावून त्यावर स्वतःचे फोटो लावून मिरविणाऱ्यांचे प्रमाण तर खूपच वाढले आहे, असे फ्लेक्स काढण्यास कोणी धजावत नाही, याचा गैरफायदा घेतला जात आहे.

पुण्याला स्वतःची संस्कृती आहे. समाजसुधारकांचे हे माहेरघर आहे. शाहू-फुले-आंबेडकरांच्या आचार विचारांचा पगडा येथे आहे, पण या सर्व चांगल्या गोष्टी विसरून आपण शहराला विद्रूप करीत आहोत. हे थांबविण्यासाठी आता प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनीच कार्यकर्त्यांना आवर घालायला हवा. प्रशासनाने न घाबरता फौजदारी कारवाई करायला हवी. फ्लेक्स, बॅनरचे स्वतंत्र धोरण तयार करून अंमलबजावणी करायला हवी, अन्यथा हे रोखणे कठीण होईल.

हे नक्की करा...

  • अनधिकृत फ्लेक्सवर फौजदारी गुन्हा

  • फ्लेक्स तयार करणाऱ्यानेच तो कुठे लावणार याचे प्रतिज्ञापत्रक घ्यावे

  • फ्लेक्स, बॅनरसाठीच्या जागा ठरवून द्याव्यात, त्यासाठी शुल्क घ्यावे

  • फ्लेक्ससाठी संबंधित महापालिका अधिकारी, पोलिस यांच्यावर जबाबदारी निश्चित करावी

  • शहर विद्रूप करणाऱ्यास निवडणुकीत घरी बसवा

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top