
पवार यांच्या मोदी बागेतील निवासस्थानी बंदोबस्त
पुणे, ता. ८ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी एसटी कामगार आंदोलकांनी केलेल्या आंदोलनाच्या घटनेचे पडसाद शुक्रवारी शहरातही उमटले. मुंबईतील घटनेनंतर काही वेळातच पवार यांच्या मोदीबाग येथील निवासस्थानाच्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला. कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यादृष्टीने पोलिसही सक्रिय झाले आहेत.
शुक्रवारी एसटी कामगार आंदोलकांनी पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी आंदोलन केले. केवळ तेवढ्यावरच न थांबता आंदोलकांनी पवार यांच्या घराच्या दिशेने चप्पल फेकल्यामुळे या आंदोलनाला वेगळे वळण मिळाले. दरम्यान, मुंबईतील घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पुणे पोलिसांनी पवार यांच्या मोदीबाग येथील निवासस्थानाभोवती शुक्रवारी दुपारपासूनच कडक बंदोबस्त ठेवला होता. परिसरामध्ये बॅरीकेडस् लावण्यात आले आहेत. शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी हा बंदोबस्त करीत आहेत. परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे यांनी निवासस्थानाच्या परिसराला भेट देत बंदोबस्ताचा आढावा घेतला.
दरम्यान, पुण्यात आंदोलनाला वेगळे वळण मिळू नये, यादृष्टीने पोलिस सक्रिय झाले आहेत. पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे म्हणाले, ‘‘पोलिसांकडून पवार यांच्या निवासस्थानाभोवतीच्या सुरक्षिततेसंदर्भात आम्ही योग्य ती काळजी घेत आहोत.’’
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..