
यूजीसीचे ट्विटर अकाऊंट हॅक
पुणे, ता. १० : देशभरातील विद्यापीठांवर नियंत्रण ठेवणारी संस्था म्हणून ओळख असलेल्या विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) ट्विटर अकाऊंट रविवारी पहाटे सायबर गुन्हेगारांनी हॅक केल्याचे उघडकीस आले. यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. सायबर गुन्हेगारांनी त्यावर नियंत्रण मिळविल्यानंतर ट्विटरच्या प्रोफाईलवर व्यंगचित्र वापरुन अनेक अनोळखी व्यक्तींना टॅग करण्यास सुरुवात केल्याचे आढळून आले.
''यूजीसी''च्या माध्यमातून देशातील बहुतांश विद्यापीठांवर नियंत्रण ठेवण्याचे काम केले जाते. त्यामुळे यूजीसी देशातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठे नाव आहे. यूजीसीचे मुख्य कार्यालय दिल्लीत असून त्यांच्याकडून समाजमाध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. युजीसीकडून वेबसाईट, ट्विटर अकाऊंटमार्फत विद्यापीठांची अद्ययावत माहिती, अधिनीयम, प्राध्यापक भरती, संशोधन यादी, विविध प्रकारच्या योजना व अन्य उपक्रमांबाबची माहिती सर्वांपर्यंत पोचविली जाते. विशेषतः त्यांच्या @ugc_india या ट्विटर अकाऊंटचे सुमारे तीन लाख फालोअर्स आहेत. दरम्यान, रविवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात सायबर गुन्हेगारांनी संबंधित ट्विटर अकाऊंट हॅक केले. त्यानंतर त्यांनी अनेक अनोळखी व्यक्तींना संबंधित अकाऊंटवरुन टॅग करण्यास सुरुवात केली. दरम्यान, यूजीसी प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन हा हल्ला थांबविण्यासाठीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली.
मागील काही दिवसात भारतीय हवामान खाते (आयएमडी), उत्तर प्रदेश मुख्यमंत्री कार्यालय या दोन मोठ्या संस्थांचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्याच्या घटना घडल्यानंतर आता युजीसीचेही अकाऊंट हॅक झाले आहे.
अकाऊंटच्या रिकव्हरीचे काम सुरू
दरम्यान, अनोळखी सायबर गुन्हेगारांनी यूजीसीचे अकाऊंट हॅक करण्याचा प्रकार केला असल्याचे पुढे आले आहे. या प्रकारामागे नेमके कोण आहे, हे अद्याप पुढे आले नाही. त्यादृष्टीने युजीसीकडून ट्विटर अकाऊंटची रिकव्हरी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, काही दिवसांपुर्वीच सायबर गुन्हेगारांनी भारतीय हवामान खात्याचे (आयएमडी) ट्विटर अकाऊंटही हॅक केले होते. त्याचबरोबर उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्री कार्यालयाचेही ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले होते. त्यापाठोपाठ युजीसीचेही अकाऊंट हॅक झाल्याने सायबर हल्ल्याच्या घटनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..