मशागतीचे दर वाढले

मशागतीचे दर वाढले
Published on

इंधन दरवाढीमुळे मशागतीचे दर वाढले
-----
पेट्रोल-डिझेलचा पुरवठा मात्र सुरळीत; अफवांमुळे पंपांवर अनेक ठिकाणी गर्दी
-----
संदीप नवले ः ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू असला, तरी सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवांमुळे काही ठिकाणी पेट्रोलपंपांवर गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र, इंधनाचा पुरवठा नियमित असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, इंधन दरवाढीचा फटका शेती मशागतीसह शेतीमाल वाहतुकीलाही बसू लागला असून ट्रॅक्टर चालकांनी मशागतीच्या दरात प्रति एकर सुमारे १०० रुपयांची वाढ केली आहे.
जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून नियमित पुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात सुमारे एक हजारांहून अधिक पेट्रोलपंप कार्यरत असून दरमहा सुमारे १६ कोटी लिटर डिझेल आणि १० कोटी लिटर पेट्रोलची विक्री होत आहे. शासनाच्या दरानुसार पेट्रोल प्रति लिटर १०८ रुपये २२ पैसे, तर डिझेल ९४ रुपये ७४ पैसे दराने उपलब्ध आहे. काही ठिकाणी अचानक वाढलेल्या गर्दीमुळे पेट्रोलपंपांवरील इंधन तात्पुरते संपत आहे. नव्याने टँकर पोहोचण्यास काही वेळ लागत असल्याने इंधन टंचाईच्या अफवा पसरत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून इंधनाचा अतिरिक्त साठा करू नये, असे आवाहन पेट्रोलपंप चालकांकडून करण्यात येत आहे.
खरीप हंगाम तोंडावर आल्याने ग्रामीण भागात शेतीच्या मशागतीला वेग आला आहे. ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरणी, रोटाव्हेटर, सरी काढणे, काकरपाळी आणि पेरणीची कामे सुरू आहेत. मात्र, मागील सहा दिवसांत इंधन दरात दोनवेळा वाढ झाल्याने ट्रॅक्टर चालक आणि शेतीमाल वाहतूकदारांच्या खर्चात वाढ झाली आहे. विशेषतः ऊस पट्ट्यात मशागतीच्या दरात प्रतिएकर सुमारे १०० रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तसेच शेतीमाल वाहतुकीच्या दरातही १०० ते २०० रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पुढील काळात इंधन दर आणखी वाढल्यास मशागती व वाहतूक दरात अधिक वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया -----
आमच्या भागात मशागतीची कामे वेगाने सुरू आहेत. सध्या मी सातत्याने ट्रॅक्टरद्वारे मशागतीचे कामे करतो. त्यासाठी लागणारे पेट्रोल-डिझेल वेळेवर उपलब्ध होत असल्याने फारशा अडचणी येत नाहीत. त्यामुळे अद्याप आमच्या भागात मशागतीच्या दरात वाढ करण्यात आलेली नाही. मात्र, भविष्यात इंधनदर आणखी वाढल्यास दरवाढ करणे अपरिहार्य ठरेल.
- संतोष खेंगरे, ट्रॅक्टर चालक, माळशिरस (सासवड)
----
आमचा परिसर बागायती तसेच ऊसपट्टा क्षेत्र असल्याने ऊस लागवडीसाठी मशागतीची कामे मोठ्या प्रमाणावर करावी लागतात. सध्या इंधनदर वाढल्यामुळे आमच्या भागात मशागतीच्या दरात प्रतिएकर सुमारे १०० रुपयांची वाढ झाली आहे.
- प्रल्हाद वरे, प्रगतशील शेतकरी, मळद (बारामती)

चौकट ----
बारामती भागात ट्रॅक्टरद्वारे मशागतीचे एकरी दर
मशागत --- जुने दर --- नवीन दर (रुपयांत)
नांगरणी --- ३२०० --- ३३००
फणपाळी --- २००० --- २१००
कट सरी काढणे --- ३००० -- ३१००
पेरणी करणे --- २००० -- २१००
रोटावेटर मारणे --- २००० -- २१००
(टीप ः तालुकानिहाय दर वेगवेगळे असू शकतात.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com