आसू - फलटण अभियांत्रिकी आणि पुण्याच्या ''डीआयएटी'' (DIAT) यांच्यात सामंजस्य करार
फलटण अभियांत्रिकी- ‘डीआयएटी’त सामंजस्य करार
आसू, ता. १५ : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने आपल्या शैक्षणिक आणि संशोधन प्रवासात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. महाविद्यालयाचा संशोधन आणि बौद्धिक संपदा हक्क कक्ष आणि संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी पुण्याची नामांकित संस्था डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी (डीआयएटी) यांच्यात नुकताच सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला.
या कराराचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थी आणि प्राध्यापकांमध्ये संशोधन संस्कृती, नवनिर्मिती आणि बौद्धिक संपदा निर्मितीला चालना देणे हा आहे. हा करार २८ नोव्हेंबर २०२५ पासून लागू झाला असून, तो पुढील तीन वर्षांसाठी वैध असणार आहे.
या करारामुळे फलटण अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना आता डीआयएटीच्या प्रयोगशाळांमध्ये इंटर्नशिप, मिनी-प्रोजेक्ट्स आणि अल्पमुदतीचे प्रशिक्षण घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. दोन्ही संस्थांचे प्राध्यापक एकमेकांच्या कॅम्पसमध्ये जाऊन व्याख्याने आणि कार्यशाळा घेऊ शकतील, ज्यामुळे ज्ञानाची देवाणघेवाण होईल.
दोन्ही संस्था मिळून संयुक्त संशोधन प्रकल्प आणि प्रकाशनांवर काम करतील. पेटंट ड्राफ्टिंग, फाइलिंग आणि आयपीआर जनजागृती कार्यक्रमांसाठी डीआयएटीकडून तांत्रिक मार्गदर्शन आणि सहकार्य मिळेल. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील फंडिंग एजन्सींकडे संयुक्त प्रस्ताव सादर करण्यासाठी दोन्ही संस्था सहकार्य करतील.
या करारावर फलटण अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोजकुमार व्ही. दळवी आणि डीआयएटीचे डीन (अॅकॅडेमिक्स) वरिष्ठ प्रा. डॉ. बालसुब्रमण्यम कंडासुब्रमण्यम यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
या करारामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रगत संरक्षण तंत्रज्ञानाशी जोडले जाणे शक्य होईल, असे फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम यांनी सांगितले.
कराराबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रामराजे नाईक- निंबाळकर, शाळा समितीचे अध्यक्ष रघुनाथराजे नाईक- निंबाळकर, सेक्रेटरी संजीवराजे नाईक- निंबाळकर यांनी महाविद्यालय प्रशासनाचे अभिनंदन केले.
----------------------------
02325
पुणे : सामंजस्य करारप्रसंगी डॉ. बालसुब्रमण्यम के., अरविंद निकम, डॉ. मनोजकुमार दळवी आदी.
-------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

