फलटण  : महायुती विजयी जाहीर आभार सभा बातमी

फलटण : महायुती विजयी जाहीर आभार सभा बातमी

Published on

फलटणकरांनी षड्‌यंत्रकारी नेतृत्वाला नाकारले

जयकुमार गोरे; फलटणमध्ये नवनिर्वाचित नगराध्यक्षांसह नगरसेवकांचा सत्कार

फलटण, ता. २६ : पालिका निवडणुकीत महायुतीचा झालेला विजय हा सत्तांतर नसून गेल्या ३० वर्षांतील एकाधिकारशाहीचा अंत झाला आहे. विरोधकांचा वेळ फक्त षड्‌यंत्र करण्यामध्येच गेला आहे. त्यामुळे फलटणच्या मातीचे गेले ३० वर्षांत प्रचंड नुकसान झाले आहे. आता खऱ्या अर्थाने विकासाचे नवे पर्व सुरू झाले. फलटणकरांनी परिवर्तनाचा कौल दिला असून, एका षड्‌यंत्रकारी नेतृत्वाला नाकारले आहे. फलटणच्या जनतेने आमदार दिला, नगराध्यक्ष दिला, आता मिनी विधानसभा असलेल्या पंचायत समितीचा सभापती महायुतीचा द्या. तुमच्या वाट्याला ५० कोटींचा निधी असेल, तर मी रस्ते विकासासाठी २०० कोटी निधी देईन, असा विश्वास ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला.

येथील गजानन चौक पालिकेतील महायुतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासह नगरसेवकांचा सत्कार आणि जाहीर आभार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार सचिन पाटील, प्रल्हादराव साळुंखे-पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, नरसिंह निकम, डी. के. पवार, विश्वासराव भोसले, सोमा जाधव, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या जिजामाला नाईक-निंबाळकर, मनीषा नाईक-निंबाळकर उपस्थित होत्या.

मंत्री गोरे म्हणाले, ‘‘विरोधकांनी नेहमीच विकासाला खीळ घातली आहे. पाणी, रेल्वे, एमआयडीसी आणि रुग्णालयांना विरोध करणारे नेतृत्व मी पहिल्यांदाच पाहिले. मात्र रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सत्र न्यायालय, परिवहन ऑफिस, प्रशासकीय इमारती, महसूल भवन, शहरातील पालखी मार्ग ही कामे करून फलटणच्या जनतेचा विश्वास संपादन केला. म्हणूनच फलटणच्या जनतेने नगरपालिकेत त्यांना सत्ता दिली. रणजितसिंह यांच्या पाठीशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संपूर्ण सरकार आहे. आता फलटणकरांनी येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही हीच ताकद दाखवावी. मी रस्त्यांसाठी २०० कोटींचा निधी आणण्याची जबाबदारी घेतो’’

आमदार पाटील म्हणाले, ‘‘आम्ही ही निवडणूक केवळ विकासाच्या मुद्द्यावर लढवली आहे. रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि पाणी या प्रश्नांना आमचे प्राधान्य असेल. फलटण शहर कमीत कमी कालावधीत फलटण शहर बारामतीच्या तोडीचे करण्याचा प्रयत्न राहील.’’

समशेरसिंह म्हणाले, ‘‘फलटण हे माझे घर आहे आणि घराची काळजी घेणे हे माझे कर्तव्य आहे. विरोधकांनी आजपर्यंत पालिकेकडे उत्पन्नाचे साधन म्हणून पाहिले. आता मात्र ही लोकांच्या मालकीची पालिका असेल. येत्या सहा महिन्यांत फलटण शहर खड्डेमुक्त करू. प्रलंबित पाण्याच्या टाक्या कार्यान्वित करून फलटणला सुसज्ज आणि स्वच्छ करण्यासाठी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे.’’ यावेळी प्रल्हादराव साळुंखे-पाटील, शिवरूपराजे खर्डेकर, नरसिंह निकम जिजामाला नाईक-निंबाळकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

चौकट

३० वर्षांचे काम सहा महिन्यांत करायचे

निवडणुकीमध्ये आपण शहरासाठी काय केलं व भविष्यामध्ये काय करणार आहोत, हे सांगून मत मागण्याची निवडणूक होती. फलटणच्या मास्टरमाइंडने माझ्यावर कुभांड रचले; पण जनतेने या मास्टरमाइंडचा पराभव करून पुण्याला पाठवण्याचे काम केले आहे. गेल्या ३० वर्षांत जे झाले नाही ते सहा महिन्यांत करायचे आहे. शहराच्या विकासाची आणि समशेरसिंह यांनी दिलेल्या शब्दाची जबाबदारी माझी, आमदार सचिन पाटील आणि मंत्री जयकुमार गोरे यांची राहील, असा शब्द रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिला.

02368
फलटण : मेळाव्यात मार्गदर्शन करताना जयकुमार गोरे. त्या वेळी व्यासपीठावर रणजितसिंह नाईक- निंबाळकर, सचिन पाटील, समशेरसिंह नाईक- निंबाळकर, शिवरूपराजे खर्डेकर, दिलीपसिंह भोसले आणि प्रल्हादराव साळुंखे पाटील.

Marathi News Esakal
www.esakal.com