स्पोर्ट दुचाकीची चक्कर कोरफळेच्या तरुणाला भोवली ; उपचारादरम्यान बार्शीत मृत्यू .
स्पोर्ट दुचाकीवरील नियंत्रण
सुटून तरुण आदळला दगडावर
उपचारादरम्यान बार्शीत मृत्यू; गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
बार्शी, ता. १५ : कोरफळे (ता. बार्शी) येथील तरुण स्पोर्ट दुचाकीची चक्कर दे, म्हणून मित्राकडून दुचाकी घेऊन गेला असता, वळणावर वेगाचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला दगडावर आदळला. जखमी झाल्यानंतर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला असून, स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अस्लम अकबर अतार (वय २५, रा. कोरफळे) यांनी फिर्याद दाखल केली. दादा तानाजी कसबे (वय २८, रा. कोरफळे) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अपघाताची घटना रविवारी (ता. १३) दुपारी तीन वाजता घडली.
कोरफळे येथील दुकांडी बसस्थानक चौकात अस्लम अतार हे स्पोर्ट दुचाकी (एमएच २५- बीबी ३५४३) घेऊन थांबले होते. तेव्हा त्यांचा मित्र आदर्श कसबे व तानाजी कसबे दोघेजण आले. त्यावेळी दादा कसबे म्हणाला, दुचाकी घेऊन एक वर्ष झाले, मला दुचाकीची एक चक्कर मारू दे. त्यावेळी अस्लम यांनी त्यास, तुला गाडी आवरणार नाही, पॉवरफुल आहे. तरीही त्याने आग्रह केला. मग त्यास चावी दिली. दुचाकी घेऊन तो चक्कर मारण्यासाठी पानगाव रस्त्याने गेला. दोघे मित्र चौकात थांबले बराच वेळ झाला तरी दादा कसबे परत आला नाही.
वाट पाहात थांबलेले दोघे पानगाव रस्त्याने खंडोबा माळ वनीकरण येथे आले असताना वळणावर दादा कसबे बेशुद्ध अवस्थेत जखमी होऊन दगडात पडलेला दिसला. डोक्यास गंभीर जखम झाली होती. वाहन बोलावून बार्शी येथील खासगी रुग्णालयात त्याला उपचारार्थ दाखल केले. उपचार सुरू असताना रविवारी (ता. १४)दादा कसबे याचा मृत्यू झाला. दुचाकीचे ९० हजार रुपयांचे नुकसान झाले असून, स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत घोळवे तपास करीत आहेत.

