कोर्टाबाहेर पाऊल टाकत न्यायाधीशांची माणुसकी !

कोर्टाबाहेर पाऊल टाकत न्यायाधीशांची माणुसकी !
Published on

माणुसकीसाठी न्यायाधीशांचे कोर्टाबाहेर ‘पाऊल’
ज्येष्ठ महिलेसाठी न्या. बागडे कोर्टाबाहेर; परिसरात चर्चा

सकाळ वृत्तसेवा
बार्शी, ता. १२ : राष्ट्रीय महालोक अदालतीत न्यायासोबत माणुसकीचेही दर्शन घडले. सहदिवाणी न्यायाधीश आर. पी. बागडे यांच्यासमोर सुनावणीसाठी आलेल्या एका प्रकरणातील ज्येष्ठ महिला पक्षकाराला न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचणी येत असल्याचे लक्षात येताच त्यांनी स्वतः न्यायालयाबाहेर येऊन कामकाज पूर्ण केले. त्यांच्या या संवेदनशील भूमिकेमुळे न्यायालय परिसरात समाधानाची भावना व्यक्त होत आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशानुसार बार्शी तालुका विधी सेवा समिती आणि बार्शी वकील संघ यांच्या वतीने तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश व्ही. के. मांडे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय महालोक अदालत आयोजित करण्यात आली होती. या अदालतीत तब्बल २ हजार ४५७ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. त्यामधून दोन कोटी २७ लाख ३३ हजार २६५ रुपयांची वसुली झाली.
बार्शी राष्ट्रीय लोकअदालतीत सुनावणीसाठी उपस्थित असलेल्या ज्येष्ठ पक्षकार सखुबाई गवळी यांना न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करताना अडचण होत असल्याची बाब न्यायाधीश बागडे यांच्या निदर्शनास आली. गवळी यांच्या सोयीसाठी ते स्वतः न्यायालयाबाहेर आले आणि तेथेच तडजोडीची प्रक्रिया पूर्ण केली. न्यायव्यवस्थेतील संवेदनशीलतेचे दर्शन घडविणाऱ्या या कृतीची उपस्थितांमध्ये चर्चा होती.
या लोकअदालतीसाठी जिल्हा न्यायाधीश व्ही. के. मांडे, न्या. पी. व्ही. राऊत, सहदिवाणी न्यायाधीश एच. यू. पाटील आणि सहदिवाणी न्यायाधीश आर. पी. बागडे अशी चार पॅनेल कार्यरत होती. बार्शी वकील संघाचे अध्यक्ष ॲड. रणजित गुंड, पॅनेल विधिज्ञ, न्यायालयीन कर्मचारी व इतर सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले.

२४५७ प्रकरणे तडजोडीने मिटली
या महालोक अदालतीत ७८ प्रलंबित दिवाणी तसेच तडजोडीचे फौजदारी खटले आणि दाखलपूर्व २ हजार ३७९ प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली. त्यामध्ये प्रलंबित प्रकरणांत १ कोटी ५१ लाख ६६ हजार १९१ रुपये, तर दाखलपूर्व प्रकरणांत ७५ लाख ६६ हजार ७४ रुपयांची वसुली झाली. बार्शी न्यायालयात प्रलंबित असलेली दिवाणी व फौजदारी अशी ३ हजार ७२१ आणि दाखलपूर्व ६ हजार ५०४ अशी एकूण १० हजार २२५ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी एकूण २ हजार ४५७ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com