

नववर्ष स्वागतासाठी गिरिस्थाने गजबजली
पाचगणी, महाबळेश्वरला पर्यटकांची गर्दी; हॉटेल, निवासस्थाने, कृषी पर्यटन केंद्रांत बुकिंग
फूल
रविकांत बेलोशे ः सकाळ वृत्तसेवा
भिलार, ता. २७ : नूतन वर्षांच्या स्वागतासाठी जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून ओळखली जाणारी पाचगणी आणि महाबळेश्वर ही दोन्ही गिरिस्थाने सज्ज झाली आहेत. सलग सुट्यांमुळे पर्यटकांनी या थंड हवेच्या ठिकाणांकडे धाव घेतली असून, दोन्ही शहरे सध्या पर्यटकांच्या गर्दीने अक्षरशः ओसंडून वाहत आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात नवीन वर्षाचे स्वागत करण्यावर पर्यटकांनी विशेष भर दिला आहे.
पाचगणीतील प्रसिद्ध टेबललँड पठारावर घोडेस्वारी आणि घोडागाडीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडाली आहे. महाबळेश्वरच्या वेण्णा लेकवर नौकाविहारासाठी पर्यटकांच्या रांगा लागल्या असून, गुलाबी थंडीत गरमागरम मक्याचे कणीस आणि आइस्क्रीमचा आस्वाद घेताना पर्यटक दिसत आहेत. स्ट्रॉबेरीचा चक्क शेतात जाऊन आस्वाद घेत आहेत. निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या या दोन्ही शहरांमध्ये पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक बाजारपेठेत आणि व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पालिकेकडूनही पर्यटकांच्या स्वागतासाठी परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे.
थर्टी फर्स्टसाठी खास मेजवानी
शहरातील हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि क्लबनी ''थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन''साठी आकर्षक पॅकेजेस जाहीर केली आहेत. यात सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत रजनी आणि विशेष भोजनाचा समावेश आहे. काही हॉटेल मालकांनी गर्दीचे नियोजन करण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे, तर अनेकांनी इमारतीच्या गच्चीवर आणि सोसायट्यांच्या आवारात कौटुंबिक पार्टीचे नियोजन केले आहे. ग्रामीण भागातील तापोळा, भिलार आणि परिसरातील कृषी पर्यटन केंद्रांनाही तरुणाईची मोठी पसंती मिळत आहे. अनेक ठिकाणी बुकिंग फूल झाले आहे.
पोलिसांचा ‘ऍक्शन प्लॅन’ आणि इशारा... नववर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये हुल्लडबाजी, धिंगाणा किंवा अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर पाचगणी आणि महाबळेश्वर पोलिस करडी नजर ठेवून आहेत. अलीकडेच पाचगणी पोलिसांनी केलेल्या अमली पदार्थविरोधी कारवाईच्या पार्श्वभूमीवर, पोलिसांचा बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून जिल्ह्यातून अतिरिक्त पोलिस कर्मचारी मागवण्यात आले आहेत.
धुळीचा त्रास आणि पर्यायी मार्ग सध्या पाचगणी आणि वाई परिसरात मुख्य रस्त्यांची कामे सुरू असल्याने धुळीच्या साम्राज्यामुळे पर्यटक आणि वाहनचालक त्रस्त आहेत. यामुळे अनेक पर्यटक ‘पाचगणी-पाचवड’ मार्गाचा वापर करत आहेत. परिणामी, या अरुंद रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली असून, प्रशासनाने या मार्गावर विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
चौकट
------------
पर्यटकांनो, ‘हा’ पर्यायी मार्ग निवडा
--------------
सध्या पाचगणी, वाई आणि महाबळेश्वर परिसरात मुख्य रस्त्यांची कामे वेगाने सुरू आहेत. यामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले असून, वाहनचालक आणि पर्यटक कमालीचे त्रस्त झाले आहेत. ही गैरसोय टाळण्यासाठी पर्यटकांनी या पर्यायी मार्गांचा अवलंब करावा. पुणे-मुंबईकडून येणाऱ्यांसाठी पाचवड फाट्यावरून कुडाळ-काटवलीमार्गे पाचगणी घाटातून येणे अधिक सोयीचे ठरेल. सातारा बाजूने येणाऱ्यांसाठी सातारा-मेढा-केळघर मार्गाचा वापर करावा. मुख्य मार्गावरील गर्दी आणि धुळीचा त्रास टाळण्यासाठी या मार्गांनी प्रवास केल्यास आपला प्रवासाचा आनंद द्विगुणित होईल, असे आवाहन करण्यात येत आहे.
कोट -
सलग सुट्यांमुळे महाबळेश्वर, पाचगणी आणि भिलार परिसरातील सर्व हॉटेल्स व निवासस्थाने ''हाऊसफूल'' होण्याच्या मार्गावर आहेत. पर्यटकांनी गैरसोय टाळण्यासाठी आगाऊ बुकिंग करूनच पर्यटनाला यावे.
- रमेश चोरमले, अध्यक्ष, महाराष्ट्र पर्यटन निवास संघटना.
कोट-
‘‘पर्यटकांनी वाहन चालवताना काळजी घ्यावी. हॉटेल व्यावसायिकांनी आवाजाच्या मर्यादेचे पालन करावे आणि आपल्या परिसरात कोणत्याही बेकायदेशीर हालचाली होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. नियमांचे उल्लंघन झाल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
- दिलीप पवार, सहायक पोलिस निरीक्षक, पाचगणी.
सोबत फोटो आहे.
BHL25B07026, BHL25B07027, BHL25B07028
पाचगणी : शहरातील पर्यटनस्थळावर पर्यटकांची गर्दी होत आहे. (रविकांत बेलोशे ः सकाळ छायाचित्रसेवा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.