रविवारची सुट्टी साधून प्रचाराची रणधुमाळी
भोसरी, ता. २८ : महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांना प्रचार करण्यासाठी तीन रविवार आणि दोनच गुरुवार मिळणार आहेत. त्यातील पहिल्या रविवारी इच्छुक उमेदवारांनी प्रभागात प्रचार फेरी, घरोघरी भेट घेत मतदारांशी संपर्क साधला.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीचे मतदान १५ जानेवारीला होणार आहे. त्यामुळे निवडणुतील उमेदवारांना प्राचारासाठी अगदी १५ दिवसच मिळणार आहेत. त्यातही रविवार शासकीय, बॅंक नोकरदार, त्याचप्रमाणे गुरुवारी कामगारांचा सुट्टीचा दिवस असतो. त्यामुळे या दिवशी उमेदवारांद्वारे मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातो. दरम्यान, रविवारी (ता. २८) राजकीय पक्षांनी परिसरात प्रचार फेरी काढून, गृहभेटी देऊन मतदारांशी संपर्क साधला. त्यामुळे भोसरी परिसरात निवडणुकीची धामधून रविवारी पहायला मिळाली.
भोसरी, दिघी, इंद्रायणीनगर प्रभागातील काही पक्षाच्या उमेदवारांनी वाजत गाजत रॅली काढून मतदारांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित केले. तर, काही उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांशी वैयक्तिक संपर्क साधणे पसंत केले. त्यामुळे परिसरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याचे दिसून आले. माजी नगरसेवकांद्वारे प्रभागाती स्वतःच्या कामगिरीबरोबरच पक्षाच्या कामगिरीची माहिती ध्वनिक्षेपकाद्वारे सांगण्यात येत होती.

