ढेबेवाडी तळमावल्यात माजी विद्यार्थ्यांचे अनोखे दातृत्व

ढेबेवाडी तळमावल्यात माजी विद्यार्थ्यांचे अनोखे दातृत्व

Published on

तळमावल्यात दातृत्वातून वाचन संस्कृती

के. सी. कॉलेजमध्ये माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम; ५० हजारांची पुस्तके सुपूर्द

ढेबेवाडी, ता. २८ : जिथं शिक्षण घेऊन जीवनात यशस्वीपणे उभे राहिलो, त्या महाविद्यालयात सध्या शिक्षण घेत असलेल्या आपल्याच भावंडांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता, यावी यासाठी तळमावले (ता. पाटण) येथील काकासाहेब चव्हाण महाविद्यालयातील बी. कॉम भाग तीनच्या २००६ च्या बॅचने महाविद्यालयातील ग्रंथालयास ५० हजार रुपयांची पुस्तके भेट देत ज्ञानमंदिराविषयीची कृतज्ञता व्यक्त केली.
तळमावले येथे सुमारे ५६ वर्षांपासून ज्ञानदानाची सेवा बजावत असलेले श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे काकासाहेब चव्हाण महाविद्यालय संपूर्ण वांग खोऱ्यातील विद्यार्थ्याचा शैक्षणिक आधार बनले आहे. कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या अकरावीपासून पदवीपर्यंतच्या शिक्षणाची सोय असलेल्या या महाविद्यालयात शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी देश- परदेशात विविध क्षेत्रात कार्यरत असून, महाविद्यालयातील विविध उपक्रम आणि सुविधांमध्ये त्यांचा सतत हातभार लाभतो.
महाविद्यालयाच्या ग्रंथालयाचा पाटण तालुक्यात दुसरा क्रमांक लागतो. सुमारे ४० हजारांवर ग्रंथसंपदने ते समृद्ध आहे. ग्रंथालयासाठी स्वतंत्र, सुसज्ज इमारत असून, विद्यार्थी तेथे स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठीही येतात. ग्रंथालयाची समृद्धता वाढण्यासाठी माजी विद्यार्थ्यांची सतत धडपड असते.
बीकॉम भाग तीनच्या २००६ मधील माजी विद्यार्थ्याच्या बॅचने महाविद्यालयाच्या ग्रंथालयास ५० हजार रुपयांची स्पर्धा परीक्षेसाठीची पुस्तके भेट दिली. माजी विद्यार्थी संतोष पाटील यांच्यासह विद्यार्थी- विद्यार्थिनी, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.
प्रभारी प्राचार्या डॉ. यु. ई साळुंखे यांनी मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. जी. एन. पोटे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सचिन पुजारी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. बी. एस. सालवाडगी यांनी आभार मानले.

--------------------------------

07910
तळमावले : काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाच्या ग्रंथालयासाठी पुस्तके स्वीकारताना प्राचार्या डॉ. यु. ई. साळुंखे समवेत प्राध्यापक.

---------------------------------

Marathi News Esakal
www.esakal.com