मनरेगा संपविण्याचे भाजपचे कारस्थान 

विरोधकांचा हल्लाबोल; संघावरही जोरदार टीका

मनरेगा संपविण्याचे भाजपचे कारस्थान विरोधकांचा हल्लाबोल; संघावरही जोरदार टीका

Published on

मनरेगा संपविण्याचे भाजपचे कारस्थान

विरोधकांचा हल्लाबोल; संघावरही जोरदार टीका

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. १५ ः- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्यात बदलासाठी सरकारने आणलेल्या विकसित भारत जी राम जी विधेयक २०२५’ वरून विरोधी पक्षांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हे केवळ नाव बदलण्याचे नव्हे तर ‘मनरेगा’ संपविण्याचे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कारस्थान असल्याचा हल्लाबोल विरोधी पक्षांनी केला आहे.
लोकसभेत आज हे विधेयक मांडण्याचे सरकारचे नियोजन होते. मात्र लोकसभेच्या कामकाज विषयक समितीच्या बैठकीत या विधेयकावरून जोरदार गदारोळ झाला. काँग्रेस, तृणमूल काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी यावर आक्षेप घेत हे विधेयक राज्यांच्या अधिकारांवर गदा आणणारे असल्याचा आरोप केला. अखेरीस विधेयकाच्या व्यापक फेरपडताळणीच्या सरकारच्या आश्वासनानंतर गोंधळ शांत झाला. आता उद्या (ता. १६) लोकसभेत ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान हे विधेयक मांडतील.
दरम्यान, मनरेगामध्ये बदलाच्या प्रस्तावित विधेयका विरोधी पक्षांनी सरकारवर सडकून टीका केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ‘एक्स’वरून टीका करताना म्हटले, की हा केवळ ‘मनरेगा’ नाव बदलण्याचा मुद्दा नसून भाजप, रा. स्व. संघाकडून ‘मनरेगा’ संपवण्याचे हे कारस्थान आहे. संघाच्या शताब्दी वर्षांच्या निमित्ताने गांधीजींचे नाव पुसण्याचा प्रयत्न केला जात आहे. गरीब, मजुरांविरुद्धच्या प्रत्येक तरतुदीविरुद्ध काँग्रेस पक्ष संसदेत आणि रस्त्यावर जोरदार विरोध करेल. वरिष्ठ तृणमूल काँग्रेस नेते आणि राज्यसभेचे खासदार डेरेक ओ’ब्रायन यांनी मनरेगाचे नाव बदलण्याच्या प्रस्तावित निर्णयाला ‘महात्मा गांधींचा अपमान’ असे संबोधले.

Marathi News Esakal
www.esakal.com