श्री. पाटसकर साहेब यांना देणे ही विनंती. सरकारनामा साठी मजकूर
फक्त फोटो - PNE25V80457
राजस्थानच्या राजकारणाला उकळी (फोटो - अरवली पर्वतरांग)
गुजरातच्या पालनपूरपासून सुरू होत दिल्लीपर्यंत पसरलेल्या अरावली पर्वतरांगाच्या विषयावरून भाजप आणि काँग्रेस आमनेसामने आले आहेत. राजस्थान आणि हरियानाच नव्हे, तर दिल्लीतले राजकीय ‘तापमान’ही यामुळे तापले आहे. डोंगराच्या खाणकामासाठीच्या व्याख्येत केंद्राच्या अखत्यारीतील समितीने बदल केला होता व त्याला सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली होती. सत्ताधाऱ्यांनी अरावली पर्वतरांगा उद्ध्वस्त करण्याचा डाव रचल्याचा आरोप कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी केला आणि त्यानंतर विषयाला तोंड फुटले. डोंगर भुईसपाट झाले, तर थरच्या वाळवंटातील गरम हवेमुळे दिल्लीसह उत्तर भारताचा मोठा भाग भकास होईल, असा प्रचार काँग्रेसकडून करण्यात आला. दुसरीकडे या मुद्द्यावरून सोशल मीडियावर केंद्रावर प्रचंड टीका झाली. अखेर सरकारला दोन पावले मागे घेत नवीन खाणकामाच्या परवान्यांवर बंदी घालावी लागली. अजून तरी या विषयावरचे राजकारण थांबलेले नाही. राजस्थानमध्ये अरावली पर्वतांचे महत्त्व मोठे असल्याने काँग्रेसचे नेते अशोक गेहलोत यांनी या मुद्द्यावरून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न चालवला आहे. ‘अरावली’वरून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू असल्यामुळे भविष्यात हा मुद्दा भाजपला महागात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी भाजपला या विषयावर ताकही फुंकून प्यावे लागणार आहे.
बहुजन समाज पक्षाची ससेहोलपट (फोटो - मायावती, आकाश आनंद)
उत्तर प्रदेशच्या राजकारणात एकेकाळी वरचष्मा असलेल्या बहुजन समाज पक्षाला मोठी घरघर लागली आहे. लोकसभेत या पक्षाचा एकही खासदार नाही. दुसरीकडे राज्यसभेत असलेला एकमेव खासदार नोव्हेंबरमध्ये निवृत्त होणार आहेत. त्यानंतर उभय सदनात मायावतींच्या पक्षाचा एकही खासदार नसेल. थोडक्यात ३६ वर्षांच्या काळात पहिल्यांदाच संसदेत बहुजन समाज पक्षाचे अस्तित्व राहणार नाही. पक्षाची सूत्रे मायावती हलवत असल्या, तरी अलीकडील काळात त्यांनी भाचे आकाश आनंद यांच्याकडे राष्ट्रीय समन्वयक पदाची जबाबदारी दिली आहे. मध्यंतरी कौटुंबिक कलहामुळे त्यांनी आनंद यांना बाजूला सारले होते. आनंद पक्षात अजून तरी चैतन्य आणू शकलेले नाहीत. उत्तर प्रदेशात २०२७मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. भाजपने या राज्यात बऱ्यापैकी बस्तान बसवले आहे. त्यामुळे मायावती आणि आनंद यांना अपयश पचवत फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेण्यासाठी अथक मेहनत घ्यावी लागणार आहे. सध्यातरी या पक्षाची अवस्था न पाहण्याजोगी बनली आहे.
अखेर शशी थरूर पोहोचले... ! (फोटो - शशी थरूर)
काँग्रेस पक्षाच्या अधिकृत भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका मांडून माध्यमांमध्ये चर्चेत राहणारे नेते शशी थरूर यांची काँग्रेसच्या नुकत्याच झालेल्या कार्यकारिणी बैठकीतील हजेरी चर्चेचा विषय राहिली. याआधी कार्यकारिणीच्या मागील दोन बैठकांना थरूर यांनी दांडी मारली होती. एवढेच नव्हे तर दिल्लीत रामलिला मैदानावर झालेल्या काँग्रेसच्या महत्त्वाकांक्षी ‘वोटचोर गद्दी छोड’ सभेकडेही त्यांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीवरून काँग्रेसमध्येच कयास लढविले जात होते. पक्षातील एका नेत्याने तर खासगीत बोलताना इजा-बिजा नंतर आता तिजा होईल काय, अशी थरूर यांच्याबद्दल टिप्पणी केली होती. मात्र, ‘इंदिरा भवन’ या पक्ष मुख्यालयात कार्यकारिणी बैठकीसाठी आलेल्या थरूर यांनी माध्यमांना टाळण्यासाठी धावत जाऊन प्रवेश केला. अर्थात, आपली उपस्थिती नोंदविण्यासाठी धावता-धावता प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना अभिवादन करायला, ते विसरले नाहीत.
.......
दिल्लीत अटल कँटीन (फोटो - PNE25V80450)
कष्टकऱ्यांना स्वस्तात जेवण मिळावे यासाठीच्या एक रुपयात झुणका भाकर, १० रुपयांची शिवभोजन थाळी यासारख्या योजना, दक्षिणेतील अम्मा कँटीन यांसारख्या वेगवेगळ्या ठिकाणच्या योजना चर्चेत राहिल्या होत्या. आता दिल्लीतील श्रमिकांना पाच रुपयांत जेवण मिळावे यासाठी दिल्ली सरकारने अटल कँटीन योजना सुरू केली आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या १०१व्या जयंतीनिमित्त सुरू झालेल्या या योजनेत दिल्लीत १०० ठिकाणी पाच रुपयांत आमटी, भात, चार चपात्या आणि भाजी अशी थाळी उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रत्येक अटल कँटीनमध्ये ५०० जणांना जेवण मिळेल. तूर्तास केवळ ४५ अटल कॅन्टीन सुरू करण्यात आले आहेत, उर्वरित ५५ नंतर सुरू होतील. या योजनेमुळे दिल्लीत
कोणालाही उपाशी झोपण्याची वेळ येणार नाही, असा विश्वास दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी विश्वास व्यक्त केला आहे. थाळी वाटपासाठी डिजिटल टोकन दिले जातील आणि अटल कँटीनची सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नियमित देखरेखही केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
लक्ष्मी(पुत्राचा) निवास (फोटो - PNE25V80447, लक्ष्मी मित्तल)
सध्या ल्युटन्स दिल्लीच्या वर्तुळात ए. पी. जे. अब्दुल कलाम मार्गावरील एक आलिशान बंगल्याचा सौदा चर्चेचा विषय बनला आहे. सुमारे ३२ हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या या विस्तीर्ण बंगल्याचा नवा मालक कोण? हा प्रश्न विचारला जात आहे. मावळलेल्या २०२५ सालातील राष्ट्रीय राजधानी परिसरातला हा सर्वांत महागडा सौदा मानला जात आहे. या बंगल्यासाठी ३१० कोटी रुपये मोजण्यात आल्याचे म्हटले जात आहे. पोलादाच्या व्यापाऱ्यात देशविदेशात दबदबा प्रस्थापित करणाऱ्या ‘लक्ष्मी’पुत्राशी संबंधित मुंबईतील कंपनीने हा बंगला खरेदी केल्याचे सांगण्यात येत आहे. मूळ मालकाने ९५ वर्षांपूर्वीचा हा बंगला विकून दिल्लीच्या गोल्फ लिंक भागात शंभर कोटी रुपयांमध्ये दुसरा बंगला खरेदी केल्याची चर्चा आहे. पण उत्सुकता ताणली गेली आहे ती ज्याच्या नावाची चर्चा सुरू आहे, तो लक्ष्मीपुत्र या बंगल्याचा खरा निवासी आहे काय यावरून.
निवांत शेख हसीना (फोटो - शेख हसीना)
झुंडीच्या हल्ल्यामध्ये पडणारे बळी पडणाऱ्या हिंदू नागरिकांमुळे भारत आणि बांगलादेशादरम्यानचे संबंध दिवसेंदिवस तणावग्रस्त होत आहेत. वाढत्या भारत-बांगलादेश तणावात भर पडली आहे ती बांगलादेशाच्या पाच वेळा पंतप्रधान राहिलेल्या ७७ वर्षीय शेख हसीना यांच्यामुळे. बांगलादेशातील उठावामुळे पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडण्यास भाग पडलेल्या शेख हसीना यांनी १६ महिन्यांपूर्वी भारतात आश्रय घेतला तो दिल्लीलगत गाझियाबादमधील भारतीय हवाई दलाच्या हिंडन एअरबेसवर. त्यानंतर यथावकाश त्यांना अतिसुरक्षित ल्युटन्स दिल्लीत हलविण्यात आले. शेख हसीना यांना बांगलादेशाच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. पण त्यांना बांगलादेशाच्या सुपूर्द करण्याचा भारताचा इरादा नाही. शेख हसीना ल्युटन्स दिल्लीत सुरक्षित आणि निवांत आहेत. बांगलादेशात उफाळलेल्या असंतोषापासून शेकडो मैल दूर, त्या अधूनमधून ल्युटन्स परिसरातील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक लोधी गार्डनमध्ये त्या सुरक्षारक्षकांच्या गराड्यात अधूनमधून भारताने दिलेल्या आश्रयाचा आनंद घेत आहेत.
डॉ. मनमोहनसिंग यांचे विस्मरण (फोटो - डॉ. मनमोहनसिंग)
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या जाहीर भाषणांमध्ये काँग्रेसच्या बहुतांश दिवंगत पंतप्रधानांबद्दल कठोर शब्दांतून टीका करतात हे सर्वश्रुत आहे. पण सतत टीकेची झोड उठवूनही ते जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या जयंती आणि पुण्यतिथींना नाईलाजाने का होईना, ‘एक्स’वर आदरांजली वाहण्याचा उपचार पार पाडत असतात. नेहरु-गांधी घराण्याबाहेरचे लालबहादूर शास्त्री आणि पी. व्ही. नरसिंह राव यांच्याविषयी पंतप्रधान मोदींच्या मनात विशेष सद्भाव असल्याचेही अशा प्रसंगी आढळून येते. पण ज्यांची सलग दहा वर्षांची सत्ता संपुष्टात आणून देशाचे पंतप्रधान झालेल्या नरेंद्र मोदींनी दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या प्रथम पुण्यतिथीला त्यांचे स्मरणही टाळले.
(या सदरासाठी सुनील चावके, अजय बुवा, सागर पाटील यांनी लेखन केले आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

