काँग्रेसमध्ये मतभिन्नता सकाळ न्यूज नेटवर्क
काँग्रेसमध्ये मतभिन्नता
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २८ ः भाजप आणि रा. स्व. संघाच्या संघटनात्मक शक्तीची स्तुती करणाऱ्या काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांच्या मतावर काँग्रेस नेत्यांमधून भिन्न स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही नेत्यांनी त्यांचे समर्थन केले आहे तर काहींनी त्यांचे म्हणणे नाकारत संघापासून शिकण्यासारखे काहीही नसल्याचे म्हटले आहे.
पवन खेडा यांनी दिग्विजय सिंह यांचे म्हणणे नाकारले आहे तर टी. एस. सिंहदेव यांनी इतरांकडून काँग्रेस काही चांगले शिकत असेल तर त्यात काही वावगे नसल्याचे म्हटले आहे. रा. स्व. संघाकडून शिकण्यासारखे काहीही नाही. गोडसेसाठी ओळखल्या जाणाऱ्या संस्थेकडून गांधींद्वारा स्थापित संस्था काय शिकू शकते? असा उपरोधिक प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी उपस्थित केला.
तर, सिंह यांच्या भूमिकेला सहमती दर्शविणारे वरिष्ठ नेते टी. एस. सिंहदेव म्हणाले, ‘‘माझ्या माहितीप्रमाणे सिंह हे संघाच्या विचारधारेचा पूर्ण विरोध करतात. त्यामुळे त्यांच्या विधानाची वेगळी व्याख्या करण्याचे काही कारण नाही. विचारधारा वेगळी गोष्ट आहे आणि काम करण्याची पद्धत ही दुसरी बाब आहे. क्रिकेटचा एखादा संघ चांगला खेळत असेल तर त्यांचा खेळ पाहून आपल्या संघाला सुधारावे असे वाटत असेल त्यात चुकीचे काय आहे?’’

