लेखकाची बांधिलकी सामान्य माणसाशी : भारत सासणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लेखकाची बांधिलकी सामान्य माणसाशी : भारत सासणे
लेखकाची बांधिलकी सामान्य माणसाशी : भारत सासणे

लेखकाची बांधिलकी सामान्य माणसाशी : भारत सासणे

sakal_logo
By

पुणे, ता. ७ : ‘‘लेखकाची बांधिलकी सामान्य माणसाशी, आत्मनिष्ठेशी, आंतरिक विश्वाशी असते. लेखकाला सामान्यांच्या जीवनविषयक व्यवहारातील सुख दु:खाच्या कथा आणि व्यथा मांडायच्या असतात. ते मांडणे पारदर्शक, स्पष्ट आणि निर्भय असले पाहिजे.’’ अशी अपेक्षा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी व्यक्त केली.
विवेक साहित्य मंच, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, श्री मुकुंद भवन ट्रस्ट आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या नुक्कड साहित्य संमेलनाचे उद्‍घाटन शनिवार (ता. ७) जानेवारी
साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते झाले. या वेळी सासणे यांचे बीज भाषण झाले. याप्रसंगी त्यांनी जी. ए. कुलकर्णी, के. ज. पुरोहित, गंगाधर गाडगीळ आणि शांताबाई कांबळे यांच्या साहित्याचा आढावा घेतला. सासणे म्हणाले, ‘‘लेखकाने कलेच्या संदर्भात बोलावे, साहित्यांतर्गत बोलावे पण त्याने राजकीय स्वरूपाचे भाष्य करू नये असा आग्रह धरला जात आहे. प्रत्यक्षात लेखकाला सामाजिक आणि राजकीय असा काही फरक करायचाच नसतो. त्याला समाजजीवन अभिप्रेत असते. हे अभिप्रेत असलेले समाजजीवन तो प्रामाणिकपणे मांडतो आहे की नाही हा महत्त्वाचा प्रश्न असतो. तसेच विद्यमान बालसाहित्यातून अद्भुतरस हद्दपार केलेला दिसतो. त्या ऐवजी बालसाहित्य माहितीपर आणि शुष्क स्वरूपाचे झाले आहे. वाढीला लागलेल्या मुलांना अद्भुतरसाची तहान असते. जी मुले बालवयात अद्भुतरसापासून वंचित राहतात ती मुले पुढे जाऊन शुष्क, पोटार्थी, अरसिक आणि उच्च कलांबद्दल आकर्षण न बाळगणारी होतात, असे निरिक्षण बालमानसशास्त्रज्ञ नोंदवू लागले आहेत.’’ या वेळी फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य नितीन कुलकर्णी, विवेक समूहाचे समन्वयक महेश पोहनेरकर उपस्थित होते.


मराठी भाषेच्या अस्तित्वाविषयी अनेक व्यासपीठांवर प्रश्न उपस्थित केला जातो, चर्चा होते. मराठी भाषा टिकण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. परंतु, दैनंदिन व्यवहार मराठी भाषेत होत राहिले तर मराठी भाषा टिकेल. मराठी भाषा टिकविण्याची जबाबदारी सर्वसामान्यांचीही आहे.
डॉ. सदानंद मोरे, संत साहित्याचे अभ्यासक