एव्हिएशन गॅलरी ‘हवे’तच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एव्हिएशन गॅलरी ‘हवे’तच
एव्हिएशन गॅलरी ‘हवे’तच

एव्हिएशन गॅलरी ‘हवे’तच

sakal_logo
By

शिवाजीनगर, ता. १७ : पुणेकर पर्यटक तसेच विद्यार्थ्यांना जगातील विमान उद्योगात असलेल्या रोजगाराच्या संधींविषयी सर्वांगीण व शास्त्रशुद्ध माहिती देणारी सरसंघचालक मा. बाळासाहेब देवरस एव्हिएशन गॅलरी शिवाजीनगर गावठाण येथे उभा करण्यात आली आहे. गॅलरीचे उद्‍घाटन मार्च २०२० मध्ये करण्यात झाले. मात्र महापालिकेसोबत संयुक्त उपक्रमातून चालवण्यासाठी ती संस्था, ठेकेदारांना परवडत नसल्याच्या कारणावरून धूळखात पडून आहे. विद्यार्थ्यांना १० रुपये, तर ज्येष्ठ नागरिकांना २५ असे तिकीट दर महापालिकेने ठरविलेले आहेत. मात्र हा दर गॅलरी चालवण्यासाठी पुरेसा नसल्याच्या कारणावरून ती बंद असल्याची माहिती महापालिका सांस्कृतिक विभागाकडून देण्यात आली.

गॅलरीची वैशिष्ट्ये
- तळमजल्यासह एकूण चार मजली सुसज्ज इमारत
- तळमजल्यावर प्रकल्प खोली, कार्यशाळा खोली व कार्यालय
- पहिल्या मजल्यावर विमानांचा इतिहास, विज्ञान खोली, विमानांचे प्रतीकात्मक नमुने
- दुसऱ्या मजल्यावर हेलिकॉप्टर व ड्रोन नमुने, विमानतळाचे नमुने, भारतीय वायुसेनेविषयी माहिती
- तिसऱ्या मजल्यावर एरोमॉडलिंग, पॅरामोटरिंग व अंतराळ विज्ञानाबद्दल माहिती प्रदर्शन स्वरूपात

एव्हिएशन गॅलरी संयुक्तपणे चालवण्यासाठी जी संस्था पुढे येईल, त्यांना ११ महिन्यांचा करार करून दिला जाईल. संबंधित संस्थेने प्रेक्षकांना गॅलरी व्यवस्थित उपलब्ध करून द्यावी. आठ ते नऊ महिन्यांपासून गॅलरी चालवण्यासाठी पुढे कोणी येताना दिसत नाही.
- संतोष वारूळे, उपायुक्त, सांस्कृतिक विभाग, महापालिका

प्रकल्पावरील झालेला खर्च
वर्ष-खर्च झालेला
२०१६-१७ - १ कोटी ५९ लाख १४ हजार
२०१८-१९ - ८४ लाख ९९ हजार
२०१९-२० - ५८ लाख ८६ हजार

पुणे शहरात विविध जिल्ह्यांतून विद्यार्थी सहलीसाठी येत असतात. ज्या विद्यार्थ्यांनी फक्त हवेत विमान पाहिलेले असते, अशा मुलांना प्रोत्साहन म्हणून हा प्रकल्प दिमाखात चालू होणे गरजेचे आहे. जसे की प्राणी संग्रहालयात गेल्यावर मुलांना प्राण्यांची माहिती होते, त्याप्रमाणे हा प्रकल्प मुलांना ऊर्जा देणारा ठरेल. सीएसआर निधी उभा करूनदेखील हा प्रकल्प चांगल्या पद्धतीने चालवता येईल.
- वीरसेन ताम्हाणे, निवृत्त वैमानिक

शिवाजीनगर ः सरसंघचालक मा. बाळासाहेब देवरस एव्हिएशन गॅलरी चालवण्यास कोणीच तयार नसल्याने ती बंद आहे.