
नॉलेज कॉरिडॉरमधून भारत विश्वगुरूची उद्घोषणा
मयूर कॉलनी, ता. २२ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैश्विक संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या नॉलेज कॉरिडॉरमधून ‘भारत विश्वगुरू’ या संकल्पनेची उद्घोषणा नवव्या विज्ञान, धर्म, अध्यात्म व तत्त्वज्ञानाच्या जागतिक परिषदेचे संकल्पक डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी केली. माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे ९ ते ११ फेब्रुवारी या दरम्यान ही परिषद नवनिर्मित श्री काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर भरण्यात आली होती.
प्रा. कराड यांना काशी विद्वत परिषदेतर्फे ‘विश्वशांती विद्यारत्न’, बनारस हिंदू विद्यापीठाच्या भारत अध्ययन केंद्रातर्फे ‘विश्वशांती उद्गाता’, बनारस हिंदू विद्यापीठाच्या युनेस्को अध्यासनातर्फे समर्पित ‘जीवन गौरव पुरस्कार’ आणि संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठातर्फे ‘संस्कृत श्री’ असे प्रतिष्ठेचे सन्मान मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे माजी कुलपती डॉ. करणसिंग यांनी नवव्या जागतिक परिषदेचे उद्घाटन केले. या परिषदेचे वैशिष्ट्य म्हणजे १० फेब्रुवारी रोजी पार पडलेला सर्व धर्मीय शुभाशिर्वाद सोहळा. यात जगातील विविध सर्व धर्मांचे मानव कल्याणाविषयीचे मूलभूत तत्त्वज्ञान मांडण्यात आले. या ऐतिहासिक परिषदेची सांगता काशी बनारस जाहीरनाम्याद्वारे झाली. येथे सर्वसंमतीने भारत विश्वगुरू, असा उद्घोष करण्यात आला. आयोजित पत्रकार परिषदेत एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष प्रा. कराड, कार्याध्यक्ष राहुल कराड, डॉ. संजय उपाध्ये, माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, पर्यावरण तज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे, डब्ल्यूपीयूचे प्रा. कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे व प्रा. मिलिंद पात्रे उपस्थित होते.