Pune News
Pune Newssakal

Pune News : जर्मनीच्या जोडप्याने हिंदू पद्धतीने बांधली लग्नगाठ

जर्मनीच्या म्युनिच शहरात वास्तव्यास असलेले वर लुकास स्टांग व वधू टेरेसा कोर्स हे दोघेजण मित्र श्रवण शिंदे व श्रध्दा पाटील यांच्या लग्नासाठी पुण्यात आले होते.

शिवाजीनगर : जर्मनीच्या म्युनिच शहरात वास्तव्यास असलेले वर लुकास स्टांग व वधू टेरेसा कोर्स हे दोघेजण मित्र श्रवण शिंदे व श्रध्दा पाटील यांच्या लग्नासाठी पुण्यात आले होते. शिंदे यांचे लग्न हिंदू धर्म पद्धतीनुसार करण्यात येत होते. या लग्नातील धार्मिक परंपरा, लग्नामध्ये पै-पाहुण्यांचा उत्साहाने असलेला सहभाग, हळद लावणे या गोष्टी भावल्याने लुकास व टेरेसा यांनाही हिंदू पद्धतीने लग्न करण्याचा मोह आवरता आला नाही. लुकास व टेरेसा यांनी लगेच लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि हिंदू परंपरेप्रमाणे भटजी अशोक यांच्या साक्षीने विवाहसोहळा संपन्न झाला.

सेनापती बापट रस्त्यावरील रोहन गरिमा सोसायटीतील रहिवासी संजय शिंदे यांचा मुलगा श्रवण हा जर्मनीत एका खासगी कंपनीत सात वर्षांपासून नोकरीस आहेत. श्रवण व श्रद्धा यांचा विवाह सोहळा पिंपळोली (ता. मुळशी) येथे २१ एप्रिलला झाला. श्रवण जर्मनीत राहत असल्याने जर्मनीतील त्याचे मित्र, मैत्रिणी लग्नापूर्वीच तीन-चार आधी दिवस पुण्यात आले होते. लग्नातील प्रत्येक कार्यात सर्वांचा सहभाग होता.

मेंहदी काढणे, बांगड्या भरणे, साडी नेसणे, फेटा बांधणे, कपड्यांची खरेदी करणे अशा सर्व कार्यात विदेशी पाहुणे उत्साहाने सहभागी झाले. धार्मिक विधीचे महत्त्व जाणून घेत होते. या पाहुण्यांमध्ये लुकास व टेरेसा देखील सहभागी झाले होते. लुकास हा जर्मनीत सरकारी नोकरी करतो तर टेरेसा ही एका महामंडळात नोकरी करते. पुण्यात लग्नासाठी आल्यानंतर शनिवारवाडा, पेठांचा परिसर, सारसबाग आदी भागत ते फिरले, लक्ष्मी रस्त्यावरून भारतीय पारंपरिक वस्त्र, दागिने खरेदी केले. लग्नमंडप, विधी, भटजी, होम, रांगोळी, फुलांच्या माळांनी सजवलेला परिसर पाहून लुकास व टेरेसा यांना लग्न करण्याचा मोह आवरता आला नाही. त्या दोघांनी श्रवण आणि श्रद्धाच्या लग्नकार्यात हिंदू धर्म पद्धतीने आपलेही लग्न पार पाडले.

‘‘माझा मुलगा श्रवण व श्रद्धाच्या लग्नामध्ये एक सुखद घटना घडली, श्रवणचे कॅनडा, जर्मनी, ब्राझील,येथील मित्र आले होते. त्यामध्ये जर्मनीचे टेरेसा व लुकास हेही होते. त्यांना विवाह सोहळा खूप आवडला त्यांनी येथेच हिंदू पद्धतीने लग्न करून घेण्याबद्दल विचार बोलून दाखवला व आम्ही लगेच त्याला होकार दिला. थोड्याच वेळात हार, अक्षदा, विधी सामानाची जमवाजमव केली. ब्राह्मण अशोकजी यांना विनंती करून विधी मंडपात यथा योग्य हिंदू पद्धतीने लग्न लावले. तो प्रसंग आमच्या मुलाच्या लग्नासोबत अविस्मरणीय ठरला.’’
-संजय शिंदे, श्रवणचे वडील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com